भटकंती वाघजाई घाट आणि तेल्याच्या नाळेची

ट्रेकमार्ग – घोळ – कुंभेमाची -वाघजाई घाट – बडदेमाची – टिटवे – बोरावली – बोरमाची – तेल्याची नाळ – घोळदिनांक – २९ सप्टेंबर २०२४.
   आम्ही एकूण १२ जणांनी मिळून फाल्कनच्या श्री. दिलीपदादा वाटवे यांचा सोबत वरील ट्रेक केला. या साठी आम्ही पुणे - चिंचवड येथून पहाटे चारला निघुन खडकवासला, पानशेत, घोळ असा प्रवास करून घोळ ला सकाळी ०७ वाजता पोहोचलो.

   यापूर्वी गारजाईवाडीला दोनदा जाताना घोळ बायपास करून गेलो होतो पण या वेळेला मात्र गावात जाण्याची संधी मिळाली. पहाटेचा अंधार, शेवटचा १२ किलोमीटरचा खराब रस्ता आणि कशेडी गावाजवळील धबधबा पाहण्यात वेळ गेल्यामुळे आम्हाला पोहचायला अंमळ उशीरच झाला.

   सकाळी बरोबर ०८ वाजता घोळला चहा घेऊन ट्रेक सुरु केला. थोडे अंतर गेलो आणि नाष्टा थांबा झाला. या ठिकाणाहून कोकणदिवा अतिशय सुंदर दिसत होता. पुढे वाट एका पठारानंतर बरंच अंतर उतरणीची आणि दाट जंगलातून होती. पुढं एक मोठ्या डोंगराला वळसा घालून आम्हाला जायचं होतं. वाटेमध्ये आम्ही बरेच लहान-मोठे धबधबे, पाण्याचे ओहोळ पार करून पुढे जात होतो. थोडं खाली उतरुन आल्यावर समोर कुंभेवाडी दिसली. गावात जाऊन आम्ही गावातल्या हनुमान मंदिरात थोडा विसावा घेतला. काही स्थानिक मंडळींकडून त्या परिसरात असलेल्या वाटांची माहिती घेतली खरी पण गावापर्यंत झालेल्या रस्त्यामुळे बहूतेक वाटा मोडल्यातच जमा झाल्या आहेत. थोडा आराम करून आम्ही पुढे वाघजाई घाटाच्या दिशेने मार्गक्रमण केले. कुंभेवाडीतुन घाटाकडे जाताना डाव्या बाजूला पठरावर एक पायवाट जाते. त्या पठारावरून घोडनाळ, थिबथिब्या घाट, कुर्डूगड, बुधल्याची वाट, कोंडेधर, उंबर्डी, मरगळ म्हशीची वाट, घनगड, मारखिंड, मारठाण्याचा डोंगर, तैलबैला, सुधागड, सरसगड आणि विळे-भागाड एमआयडीसी असा बराच मोठा परिसर दिसत होता. मनमोहक हिरव्यागार डोंगरदऱ्यांचा पॅनोरमा डोळ्यात साठवून आम्ही वाघजाई घाटाच्या उतरणीला लागलो. पावसामुळे खूप शेवाळलेल्या दगडावरून उतरणं काहीसं अवघड झालं होतं. आम्हाला बऱ्याच जणांना पाय घसरून जोरदार शेकही मिळाला. खाली उतरून आम्ही पदरातल्या बडदेमाचीला पोहोचलो. वाटेत अनेक ठिकाणी कारवी आणि सोनकी डोळे दिपवून गेली. खरंतर बडदेमाचीतून आडवं जात आम्हाला बोरमाची गाठता आली असती पण त्यामुळे दोन्ही घाटवाटा अर्ध्याच झाल्या असत्या. असं होऊ नये म्हणून आम्ही पुढे खाली पूर्ण कोकणात उतरून टिटवे गावं गाठले. एव्हाना दुपारचा एक वाजला होता. गावातील कालभैरवनाथ मंदिरात जेवणाचा थांबा केला. बारा जणांचे डबे, बरीच variety त्यामुळे जेवणावर ताव मारून, थोडा आराम केला आणि बरोबर ०१.४५ ला पुढे चालायला सुरुवात केली. वाटेत पाणी भरपूर. अगदी शेतीवाडीत, गायरानात जिकडे तिकडे पाणीच पाणी. त्यातूनच रस्ता काढत आम्ही दादाच्या नेतृत्वात पुढे जात होतो. तेवढ्यात पावसाची सर आली आणि खूप आनंद झाला पण तो फार काळ काही टिकला नाही. धड भिजलो पण नाही आणि पूर्णपणे सुकलेले पण राहिलो नाही.

   टिटव्यातून आडवं गेल्यावर पुढे बोरवली नावाचे गाव लागते. गावातील बुद्धविहारच्या कोपऱ्यावरून उजव्या हाताला वळलो आणि डांबरी सडकेवरून थेट बोरमाची गाठली. डांबरी सडकेवरचे चालणे ट्रेकरसाठी अतिशय कंटाळवाणे होते खरे पण त्याला काही पर्याय नाही किंवा रस्ता झाल्यामुळे मूळची पाऊलवाट काही आम्हाला सापडली नाही. डांबरी रस्त्याने घाट चढणं फार मुशकील. त्याचा प्रत्यय या ट्रेकला आला. साधारण घाट रस्ता दोन-अडीच किलोमीटरच असावा पण थकवा, कोकणातील आद्रता आणि डोक्यावर आलेलं ऊन काही सुचू देत नव्हतं. तीन वाजून गेले होते. अजून तेल्याची नाळ गाठायची होती. घाट रस्त्यावरून तीव्र चढामुळे ज्यांच्याकडे वाहन नाही असे स्थानिक कसे चढत असतील देव जाणे. कसेबसे ०३.४५ ला आम्ही बोरमाचीवर पोहचलो. साधारण १०० घरांचं दुमदार निसर्गसंपन्न गाव म्हणता येईल बोरमाचीला. एका स्थानिक मावशींनी आम्हाला पाणी आणि कोरा चहा करून दिला. चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. बोरमाचीच्या डांबरी घाटाने तेल्याची नाळ येण्यापूर्वीच आमचे तेल काढले होते. पण मावशींच्या चहाने पुन्हा एकदा तरतरी आणली आणि आम्ही नाळेच्या दिशेने निघालो. हीच आडवी वाट घोडनाळ आणि थिबथिब्या घाटात पण जाते. काही अंतर गेल्यानंतर मळलेली वाट सोडून आम्ही उजव्या बाजूला वळलो आणि तेल्याची नाळ चढायला सुरुवात केली. सुरवातीला नाळ चांगलीच रुंद आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळें वाटेत पाणीही होते पण प्रवाह कमी झाल्यामुळे पाणी विभागले गेले होते. मधल्या भागातून वर जाण्याची वाट काहीशी पुसट झाली होती. दादांनी बऱ्याच ठिकाणी कोयत्याने फ़ांद्या छाटून आमच्यासाठी वाट केली आणि आम्ही कसेबसे वरच्या खिंडीत पोहोचलो. अंधार पडायच्याच मार्गावर होता. तिथून पुढे अजूनही अडीच-तीन किलोमीटरची चाल बाकी होती. सुरवातीला थोडी खाली आणि नंतर वर अशी चाल चालून आम्ही एका पठारावर आलो. नंतर मात्र बहुतेक चाल पठारावरून होती. कसबसं आम्ही त्या जंगलातून पुढे सरकत होतो. खरं अंधारबन मला तिथं अनुभवायला मिळालं. संध्याकाळी बरोबर सात वाजता आम्ही गाडी जवळ पोहोचलो.

   सकाळी आठ ते संध्याकाळी सात असा अकरा तासांचा ट्रेक झाला होता. आतापर्यंतचा सर्वाधिक पायपीट करण्याचा माझा ट्रेक काल पहिल्यांदाच झाला त्यामुळं खूप आनंद झाला. दिलीपदादा, ट्रेकिंग मधील दादा का आहेत ते काल समक्ष अनुभवंल. त्यांचा वाट शोधतानाचा अनुभव आमच्या फार कामी आला. आमचे ट्रेक संयोजक हरीश कुलकर्णी आणि डॉ. रामेश्वर कविटकर याच्या नियोजनामुळे ट्रेक खूप छान पार पडला. ट्रेकला जाताना काय साहित्य सोबत असलं पाहिजे तेही कळालं. कपडे बदलून घराची वाट धरली ती कुंभेमाचीतल्या बाबांनी सांगितलेल्या वाटांचा लवकरच ट्रेक करण्याचा मनसुबा मनात धरुनच.
ट्रेक कालावधी – ११ तास एकूण अंतर – २८ किलोमीटर श्रेणी – कठिण© साकेत मिठारी

महत्वाचे असे – नवीन हौशीगौशी मंडळींनी अजिबात रिस्क घेऊ नये 🙏

Leave a Reply