कवल्या ची धार – नाखिंद – कोथळीगड

आजचा ट्रेक म्हणजे घाटवाटा आणि गिरिदुर्ग याची सांगड घालणारी !
सोबत
Shirish godbole
Pankaj shahane
Rameshwar Ramteke
अंबिवली – पेठमाची – कवल्या ची धार – नाखिंद – कोथळीगड – अंबिवली
सह्यद्रीने महाराष्ट्राला भरभरून सौन्दर्य दिले आहे , ह्याच सह्यद्रीच्या जीव कि प्राण म्हणजे घाटवाटा. घाटवाटांचा वापर हा प्राचीन काळी सर्रास होत असे त्यामुळे विकासिकरणात घाटवाटांचे महत्व खूप आहे.
अचानक ठरलेली भटकंती सत्कारणी लागली हा अभिप्राय भटकंती अंती सर्व ट्रेक भीडुनी दिला. आज साधारण 22 एक किलोमीटर ची तांगडतोड भटकंती झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पाच जण सकाळी बरोबर 4 वाजता निघून कर्जत मार्गे साधारण साडे सहा वाजता अंबिवलीत पोहचलो. गोपाळ ला वाटाड्याची सोय करून ठेवायला सांगितले होते आणि त्याप्रमाणे आमचा वाटाड्या दिलीप पेठमाची पासून पुढे आमराईत भेटणार होता. साधारण सात वाजता आम्ही सुरवात केली , साधारण दहा मिनिटाचा डांबरी रस्त्या चा टप्पा पार करून वाटेला लागलो. आंबिवली ते पेठ हे साधारण साडे चार किलोमीटर चे अंतर आम्ही 45 मिनिटात पार करून आमराईत पोहचलो जिथं मनोज भेटणार होता ( आम्ही चालत गेलो , 4 व्हिलर वर जात नाहीत पण 2 व्हिलर जाऊ शकतात )मनोज ला घेऊन आम्ही कवल्याच्या धारेकडे निघालो. कवल्याची धार तशी आव्हानात्मक कारण निमुळता रास्ता , खडी चढाई , मध्ये एक दोन दगडी पॅच , उंचीएवढं वाढलेलं गवत. रस्ता काढत पुढे निघून एका मोठ्या पठारावर पोहचलो आणि पुढील वाटेत दिसलेली पिवळीधमक सोनकी ची चादर आणि कारवीच्या फुलांचा पडलेला सडा पाहून क्षीण नाहीसा झाला. मी तरी एवढा मोठा सडा पहिल्यांदाच पहिला आणि अक्षरशः पाहतच बसलो, मन निघायचं नाव घेत नव्हतं पण पुढें नाखिंद गाठायचं होतं त्यामुळे निघावं लागलं आणि साधारण साडे दहा वाजता आम्ही नेढ्याजवळ पोहचलो. जाताना डावीकडे दिसणारे कोथळीगड , स्पष्ट दिसणारा शिवपिंडीच्या प्रतिकृतीचा पदरगड , सिद्धगड , गोरखगड , खेतोबा लक्ष वेधून घेत होते. नेढ्यात घरून आणलेली शिदोरी खाऊन पुढे नाखिंद्याच्या वाटेने कोथळीगडाकडे कूच केली. हि वाट तशी सोपी आहे ( एक दोन पॅच वगळता ) आणि साधारण एक च्या दरम्यान गड पायथ्याला पोहचलो, खूप चालल्यामुळे थोडा पंधरा एक मिनिटे अराम करून कोथळीगड बालेकिल्ल्याकडे निघालो. चढाई मोठ्या दगड धोंडयांतून आणि पूर्ण छातीवर असल्याने थोडी दमछाक झाली ! साधारण अर्ध्या तासात महादरवाज्यात पोहचलो. आता फक्त अवशेष अस्तित्वात आहेत आणि दरवाजा पाहायला मिळत नाही. तेथून थोडं पुढं गेल्यावर आपल्याला दोन तोफा बघायला मिळतात. इथून आपल्याला माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या दिसतो पण खराब व्हिसिबलिटी मुळे आमची निराशाच झाली.
किल्ल्यावरील कातळाच्या कातळाच्या पोटात गुहा, टाकी, लेणं आणि गडमाथ्यावर जाणारा जीना खोदलेला आहे. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल भूमी आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब आहेत. गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायर्या कोरलेल्या आहेत.पायर्यांच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. पायर्यांच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. त्यावर शरभ शिल्प आहेत. गडमाथ्यावर तलाव आणि उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. गड फिरून साधारण साडे तीन वाजता आम्ही परत आंबिवलीत पोहचलो. नेहमीप्रमाणे आडवा हात मारून पुण्याकडे निघालो ते असंख्य आठवणींनी !
अशी हि आमच्या ट्रेक भिडु बरोबर केलेली आजची जंबो भटकंती.
आज ची भटकंती नेहमीचे साथीदार शिरीष , पंकज , साकेत , आणि आमचे नवीन साथीदार डॉ कविटकर.
गोपाळने वाटाड्या आणि जेवणाची सोय केल्याबद्दल आभार .
Write up by

Leave a Reply