वाघजाई घाटवाट – ठाळाणे लेणी – सवाष्णी घाटवाट
सहयाद्री जर जवळून पाहायचा असेल त्याच विहंगम दृश्य न्याहाळायचं असेल तर माझ्या मते घाटवाटांशिवाय पर्याय नाही आणि हे माझं वयक्तिक मत आहे . प्राचीन काळी ह्याच घाटवाटांना खूप महत्व असण्याचे कारण म्हणजे वाहतुकीसाठी आणि ये जा करण्यासाठी होणारा सर्रास वापर . काळाप्रमाणे शहरीकरण , डांबरीकरण , रस्ते प्रकल्प ह्यामुळे वाड्या वस्त्या वरील लोक गावाकडं / शहराकडे वळली आणि घाटवाटांचा वापर अत्यल्प होऊ लागला. दुर्लक्षित झाल्याने हळु हळु लुप्त पाऊ लागल्या .
ह्या वाटांवरून जाताना गर्द झाडीत शिरायचे, कधी तर अगदी सरपटत जाऊन वाट काढायची , तर कधी डोंगर उतारावरील आणि सह्यद्रीतील संजीवनी म्हणजेच कारवीच्या झुडपांचा आधार घेत मार्गक्रमण करायचे, आडवे येणारे ओढे-नाले पार करायचे, तर कुठे दरड कोसळल्यामुळे तुटलेले कडे चढून जायचे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य( खासकरून सवाष्णी घाटवाटेला) , खडी चढाई, लांबवर पसरलेले निर्मनुष्य जंगल ! जिकडे तिकडे फुललेली पिवळी धमक सोनकी , जांभळा लाल तेरडा , लाल तांबूस तेवना , निळी कारवी , पावसामुळे आडवी कोसळलेली भली मोठी झाडे आणि त्यामुळे वापरात असलेल्या पण बंद वाटत असलेल्या वाटा, अप्रतिम निसर्ग सौंदर्य , सोबतच प्राचीन लेणीचा ठेवा …आणि खूप काही हे सर्व अनुभवलं ते ह्या दोन्ही घाटवाटा करताना.
वाघजाई घाट वाट आपल्याला कोकणातून वर डोंगर माथ्यावर घेऊन येते. आणि याच वाटेवर आपल्याला प्रसिद्ध आणि प्राचीन अश्या लेण्यांचा समूह बघायला मिळतो. आम्ही कोकणा ऐवजी तैलबैला येथून सुरवात केली. वाटेची अवस्था पाहता हि वाट अजूनही वापरात आहे आणि दिशादर्शक रिबीन हि लावल्या आहेत. साधारण अर्ध्या तासात आपण वाघजाई मंदिराजवळ पोहचतो आणि तिथून लेणीकडे जायला विरुद्ध दिशेहून जावे. उतारा आणि वाट मळलेली असल्यामुळे जास्त त्रास झाला नाही आणि त्यात वेळ सकाळची होती. पण पावसामुळे कातळ आणि रस्ता दोन्ही शेवाळलेले होते त्यामुळे जरा जपून गेलो.
ह्या लेण्यांबद्दल जे काही थोडं फार वाचलं आहे ते म्हणजे , ठाणाळे लेणी किंवा नाडसूर लेणी हा बौद्ध लेण्यांचा समूह ठाणाळे जवळ आहे. वास्तविक पाहता ही लेणी ठाणाळे गावाच्या हद्दीत असून ती येथून जवळही आहेत. परंतु सुरुवातीच्या काळात संशोधक नाडसूरमार्गे तेथे पोहोचल्यामुळे ‘नाडसूर’ हे नाव रूढ केले होते. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहार आहेत. ठाणाळे लेणी सर्वप्रथम जे. ॲबट यांनी १८९० साली पाहिली. त्यानंतर कझिन्स यांनी या लेणींना भेट देऊन १८९१ मध्ये द केव्स ॲट नाडसूर अँड खडसांबला ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यानंतर अनेक संशोधकांनी यावर प्रकाश टाकला. म. न. देशपांडे यांच्या मते, ठाणाळे लेणी भाजा लेणीच्याही पूर्वी खोदली गेली असावीत. तसेच या लेण्यांत कमीतकमी कित्येक वेळा परिवर्धन, बदल, उत्खनन व रंगलेपन केले असावे.
लेणी बघून आम्ही सवाष्णी घाटवाटेने तैल बैला येथे निघालो. आणि जाताना आता खर आव्हान जाणवत होत कारण हि वाट तशी मळलेली नाही. पण आमचे वाटाड्या नंदू दादा नी सांगितल्याप्रमाणे हि वाट खालून बेहरामपाड्यातून येते आणि चढाई खूपच चढी आहे. पावसामुळे मोठी मोठी झाडे पण आडवी पडली होती आणि त्यामुळे वाट शोधण्या साठी अडचण येत होती. तशीच झाडा झुडपातून वाट शोधात आम्ही सवाष्णी घाटवाटेच्या मधल्या वाटेला जोडले गेलो , पण तिथूनही नीटशी मळलेली नव्हती. नंदू दादा अंदाज घेत पुढे पुढे सरकत होते आणि ते बरोबर असल्याने आम्ही निष्काळजी होतो. शेवटी भली मोठी चढाई पार करून आम्ही शेवटी कातळातल्या पायऱ्यांत पोहचलो , चढाई खूप खड़ी असल्याने आम्हाला खूप दम लागला असल्याने थोडा आराम करून , भल्या मोठ्या गवतातंतून मळलेली वाटेने तैल बैला कडे निघालो.
साधारण सात वाजता सुरु केलेली दोन्ही घाटवाटांची भटकंती दीड वाजेपर्यंत संपली. सगळे चालणारे होते त्यामुळे नाहीतर साधारण दिड तास अधिक पकडावा.
त्यानतंर श्री वामन रोकडे यांच्याकडे जेवण करून असंख्य आठवणींनी पुणे गाठले. श्री रोकडे यांनी आम्हाला वाटाड्या आणि जेवणाची सोय केल्याबद्दल त्यांचे आभार !
भेटूया लवकरच पुढच्या मोहिमेला