येता जावली जाता गोवली

“येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. जावळीस येणारच तरी यावे.. दारुगोली महजूद आहे!”जावळी (जयवल्ली) चा राजा चंद्रराव मोरेचे हे उन्मत्त उत्तर ऐकून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. परिणामी जावळीचा पाडाव तर झालाच परंतु महाराजांनी चंद्रराव मोरे व त्याचे तमाम निकटवर्तीय कापून काढले. आणि अशारितीने जावळी स्वराज्यात सामील झाली.

प्रतापवर्मा नावाचा त्याचा एक भाऊ कसाबसा जीव वाचवून विजापूरी आदिलशहाच्या दरबारी जाऊन पोचला व बादशहासमोर त्याने आपली दर्दभरी कैफियत मांडली. महाराजांनी या अगोदर बर्‍याच आदिलशाही सरदारांना आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते, त्यामुळे बडी बेगम आधीच त्रस्त होती. यथावकाश हुकमाचे पान म्हणून गर्विष्ठ व बलिष्ठ अफझलखानाची स्वराज्याच्या मोहीमेवर रवानगी करण्यात आली. पूर्वी वाईचा सुभेदार असलेला खान महाराजांनी तहाचे व कळवळ्याचे बोलणे लावून भुलवला. खान वाईवरून निघाला व जावळीच्या दुर्धर चक्रव्यूहात अलगद सापडला व मारला गेला.

भरदुपारी देखील सूर्यप्रकाश जमिनीवर पोचत नाही अशी जावळीच्या निबीड रानाची ख्याती लहानपणापासूनच वाचत व ऐकत आलो होतो. याच रानात युद्धापूर्वी महाराजांनी आपले सैन्य बेमालूमपणे दडवून ठेवले होते. त्यामुळे जावळीचे एक सुप्त आकर्षण मनात घर करून बसले होते. पदभ्रमंती करून ‘याचि देही याचि डोळा’ त्या रानाची अनुभूती घेण्याचा विचार बर्‍याच दिवसांपासून डोक्यात घोळत होता. महाबळेश्वरवरून पोलादपूरला उतरणाऱ्या घाटरस्यावर मेटतळे नावाचे गाव आहे. येथूनच रडतोंडी उर्फ अश्रुमुखी (अर्थ एकच) नावाची ऐतिहासिक घाटवाट प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या पार गावात उतरते. अफझलखान याच वाटेने भलेमोठे सैन्य घेऊन उतरला होता व पारला त्याच्या सैन्याचा मोठा तळ पडला होता. या रडतोंडी घाटवाटेने खाली उतरायचे, पारच्या आदिशक्ती रामवरदायिनीचा आशिर्वाद घेऊन प्रतापगड गाठायचा. तिथे भवानीमातेचे दर्शन घेऊन परत खाली उतरून जावळी- दरे गावला जायचे. दर्‍यातून बाजारवाटेने चढाई करून लॉडविक पॉइंट व परत महाबळेश्वर असा तगडा व तब्बल तीस किलोमीटर डोंगरयात्रेचा मानस मी माझा ट्रेकर मित्र साकेत मिठारीला दोन महिन्यापूर्वी बोलून दाखवला होता. तो फळास येण्यास मात्र ऑक्टोबर महिन्याची २७ तारीख उजाडली. ट्रेक चांगलाच कस पाहणारा असल्यामुळे निवडक तेरा वीर व एक वीरांगना (सौ. मनिषा कुतवळ) यांना घेऊन आम्ही रविवारी पहाटे चार वाजता पुणे सोडले. सगळीच मंडळी अनुभवी व चांगल्या दमसासाची होती. महाबळेश्वरला पहाटे सव्वा सहाच्या सुमारास पोचलो. हवेमध्ये छान गारवा होता. चहाची टपरी पाहिल्यावर इच्छा अनावर झाली, वाफाळलेल्या चहाच्या घोटाने हुशारी आली. महाबळेश्वर राजभवनाच्या बाजूला असलेल्या एका मोकळ्या जागेत गाड्या पार्क केल्या. लॉडविक पॉइंटवरून परत येताना हे ठिकाण सोयीचे होणार होते म्हणून तसे नियोजन केले होते. पायात बूट चढवले व पाठपिशव्या खांद्याला लटलावून पावणेसातच्या सुमारास आम्ही आमच्या डोंगरयात्रेचा श्रीगणेशा केला.

महाबळेश्वरच्या सूर्यास्त पॉईंटवरून एक पायवाट थेट मेटतळ्यात उतरते परंतु ती फारशी वापरात नसल्याचे कळाले होते. त्यामुळे आम्ही डांबरी सडकेनेच मेटतळ्याला जायचा निर्णय घेतला. पाच किलोमीटर हमरस्त्याची व उताराची वाट असल्याने मंडळी वेगातच मेटतळ्यात दाखल झाली. रडतोंडीचे तोंड सापडायला फारसे सायास करावे लागले नाहीत. मेटतळ्यापासून शंभर मीटरवर डावीकडे लागलीच वाट सापडली. पावसाळा नुकताच संपला असल्यामुळे डोंगर उतारावर गवत माजले होते. सुरवातीच्या टप्प्यात गवतात लपलेल्या वाटेची थोडी शोधाशोध करावी लागली. सकाळच्या महाबळेश्वरी गारव्याने गवतावर भरपूर दव साचले होते. थोड्याच वेळात पूर्ण बूट व पायमोजेही ओले झाले. जमीनही ओली व शेवाळलेली होती त्यामुळे अधूनमधून पाय सटकत होते. काही अंतर उतरल्यावर मात्र जुन्या बांधीव व वळणदार घाटवाटेच्या खुणा दिसू लागल्या. ठिकठिकाणी वाटेला संरक्षक कठडे बांधून वाट रूंद केलेली आढळली. अफझलखान हत्ती, ऊंट, घोडे व तोफा घेऊन या वाटेने कसा उतरला असेल याचे कल्पनाचित्र मी रंगवत चाललो होतो. अफझलवधानंतर त्याच्या सैन्याची भयंकर वाताहात झाली. रडतोंडी उर्फ अश्रुमुखी घाटवाटेचे नाव सार्थ करीत ती उरलीसुरली फौज जीव वाचवण्यासाठी याच वाटेने वर पळत सुटली असणार या मजेशीर तर्काने व महाराजांच्या धूर्त युद्धनीतीच्या कौतुकाने चेहऱ्यावर हसू उमटत होते. थोड्याच वेळात वाट घनदाट रानात शिरली. इथला कारवीचा बहर अजून संपला नव्हता. वाटेवर ठिकठिकाणी कारवीच्या फुलांचा सडा पडला होता. करवंदाच्या जाळ्या, वेडीवाकडी वाढलेली वेलवर्गीय झाडे, उंच जुनाट वृक्ष त्या रानाची गूढता अजूनच वाढवत होते. बराच मोठा इतिहास या जावळीच्या रानाने अनुभवलेला होता. रानाच्या चराचरातून त्या जाज्वल्य इतिहासाची अस्पष्ट कुजबूज त्या नीरव वातावरणातदेखील ऐकायला येत होती. मध्येच एका झाडावर आम्हाला महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरू (Giant Squirrel) उड्या मारताना दिसले. आमच्या उपस्थितीची जाणीव होताच तो लाजाळू प्राणी क्षणार्धात रानात अदृश्य झाला. तासा दीडतासात वाट रानाबाहेर पडली व पुन्हा एकदा आधुनिक डांबरी सडकेशी एकरूप झाली तसे आम्ही भानावर आलो. घोघळवाडीचा फाटा आला व नंतर कोयना नदीवरचा शिवकालीन पूल लागला. तत्कालीन वास्तुशास्त्राचा अभ्यास करता हा पूल शिवकालीन नसावा असे काही जाणकारांचे मत आहे. परंतु त्यामुळे आमच्या श्रद्धाभावनेत तिळमात्रही फरक पडणार नव्हता, आम्ही तो पूल डोळे भरून पाहून घेतला.

येथून एक किलोमीटर अंतरावर पार गाव आहे. कोणे एके काळी हे गाव कोकणातून घाटावर येणार्‍या पारघाट या व्यापारी घाटवाटेवरील महत्वाचे गाव होते. महाराजांनी ताबा घेण्याआधी या वाटेवर जावळीच्या मोर्‍यांचाच अंमल असे. व्यापाऱ्यांकडून भारानुसार जकातवसुली केली जाई. जकातीतला काही भाग रामवरदायिनीसाठी राखून ठेवला जाई. संपूर्ण वाटेवर निर्धोक व्यापार व्हावा यासाठी मोर्‍यांचा खडा सैन्यपहारा असे. घाटात “तागसडा गमावला तरी सोनेचा करून देऊ” अशी ग्वाही त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्याची नोंद आहे. अशा या ऐतिहासिक गावात आम्ही सकाळी नऊ वाजता पोचलो. आताशा पाठीवर उन्हाचा थोडा चटका जाणवू लागला होता. आदिशक्ती रामवरदायिनीच्या प्रशस्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शिदोऱ्या सोडल्या. मनिषाच्या बुटात पाणी गेल्याने तिच्या तळपायाला त्रास होत होता. ओले पायमोजे सुकवण्याचा निष्फळ प्रयत्न करून पाहिला. पुढचा पल्ला बराच मोठा असल्याने जास्त वेळ न दवडता आम्ही प्रतापगडाकडे कूच केले.पारच्या पुढे गाडीरस्ता सोडून आम्ही पुन्हा एकदा उजवीकडे दाट रानात घुसलो.

या अतिशय निबीड रानातून चालताना दोन वर्षापूर्वीचा एक रोमांचक प्रसंग आठवला. आम्ही कुडपण (भिवाची काठी) – प्रतापगड – पार अशी डोंगरयात्रा करीत होतो. प्रतापगडावरून उतरताना आमचा सर्व चमू विसकटला. आम्ही दोघे नवराबायको या रानातून झपाझप पाय उचलत खाली निघालो होतो. मनिषा पुढे व मी मागे…मनिषाच्या समोर रानात मला काहीतरी हालचाल जाणवली. मनिषाचे लक्षात नव्हते, ती निर्धास्त चालत होती. थोडे पुढे आल्यावर मला शिंगे दिसली. वाटले चला आले गाव जवळ, म्हैस दिसतीये. थोड्याच वेळात आमच्यासमोर पूर्ण वाढ झालेला एक रानगवा अवतरला. मोठ्याने ओरडून मनिषाला सांगावे तर गवा बिथरायचा. दोन तीन वेळा हळू आवाज देऊन मी तिला सावध केले. आम्ही ज्या वाटेवरून चाललो होतो त्याच वाटेवरून ते अजस्र धूड आमच्याकडे येत होते. आमची चांगलीच तारांबळ उडाली. काट्याकुट्याने भरलेल्या बाजूच्या जाळीत घुसलो. गवा महाराज क्षणभर थांबले, आमच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून शांतपणे पुढे मार्गस्थ झाले. त्या काटेरी जाळीतून आम्ही कसेबसे बाहेर पडलो व वायुवेगाने पार गाठले. गावात पोचल्यावर मात्र कुठेकुठे खरचटल्याची जाणीव झाली …असो. तो प्रसंग पुन्हा आठवला मात्र यावेळेस गवा दिसला नाही.

पाऊण तासात आम्ही प्रतापगडाच्या मुख्य दरवाजाशी पोचलो. आता रानातून बाहेर आल्यावर उन्हाचा ताव चांगलाच जाणवू लागला होता. लगोलग भवानीमातेचे मंदीर गाठले, दर्शन घेतले. मंदिरात ठेवलेली सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची तलवार पाहिली. या तलवारीने सहाशे शत्रूसैनिकांना कंठस्नान घातल्याचा उल्लेख येथे आढळतो. महाराजांच्या दैनंदिन पूजेतील स्फटिक शिवलिंग देखील येथे ठेवलेले आहे. त्यानंतर गडमाथ्यावरील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून टेहळणी बुरूजावर आलो. जयजयकार करून मनसोक्त फोटो काढले व खाली उतरणाऱ्या गाडीरस्त्याला लागलो. येथून पुढे भर उन्हात जवळपास बारा किलोमीटरची चाल कंटाळवाण्या अशा डांबरी रस्त्यावरून होणार होती. डोंगरयात्रेत डांबरी रस्त्याने चालणे म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षाच. यांत्रिकपणे पावले टाकत व त्या कधीही न संपणाऱ्या नीरस वाटेवर पायाची लाकडे होईपर्यंत चालत राहिलो. पोलादपूर- महाबळेश्वर हमरस्त्याला उजवीकडे वळालो. तद्नंतर वाडा कुंभरोशी ओलांडून पुढे जावळी फाट्यावर येऊन ठेपलो. दुपारचे दीड वाजले होते. फाट्यावरच्या एका हॉटेलमध्ये घरून बांधून आणलेले दुपारचे जेवण उरकून व पाणी भरून पुढे निघायचे असे ठरले. येथील हॉटेल मालकाने आमचे अतिशय छान आदरातिथ्य केले. वर आम्हाला पुढच्या वाटेविषयी मार्गदर्शनदेखील केले. डोंगरात अजूनही माणुसकी शिल्लक आहे याचा अजून एक पुरावा येथे मिळाला. आमचा तीस किलोमीटरच्या डोंगरयात्रेचे स्वरूप ऐकून महाबळेश्वर – प्रतापगडला सुट्टीला आलेली मंडळी मात्र विस्मयचकित झाली. हमरस्ता सोडून आम्ही जावळीच्या अरूंद गाडीवाटेला लागलो. आतापर्यंत जवळपास बावीस किलोमीटर चालणे झाले होते. जेवण झाल्यामुळे मंडळी काहीशी सुस्तावली. चमूतील अतिवेगवान मंडळीशी जुळवून घेताना माझी व मनिषाची दमछाक होत होती परंतु संयमित व लयबद्ध चाल आम्ही ढळू दिली नाही. जावळीची खालची, मधली व वरची वाडी पार केली. जावळीत वाटेविषयी पुन्हा एकदा खातरजमा करून घेतली. जावळीनंतर गाडीवाट अजूनच अरुंद झाली. चोहोबाजूंनी महाबळेश्वरच्या डोंगराने वेढलेल्या कोयनेकाठच्या दुर्गम दरे गावात आम्ही पोचलो. डाव्या बाजूला एल्फिन्स्टन पॉइंट दरीत डोकावत होता तर उजव्या बाजूला हत्ती माथ्यावर लॉडविक पॉइंट होता. उत्तरपूर्वेला क्षेत्र महाबळेश्वरचा परिसर दृष्टीपथात येत होता. दरे गावातून डाव्या बाजूला जाणाऱ्या निसणीच्या (शिडी) वाटेने श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे जाता येते. आम्ही सरळ अगोंद्यादेवीकडे जाणाऱ्या मुख्य वाटेवरून उजव्या बाजूला दक्षिणेला वळालो. लॉडविक पॉईंटच्या दिशेने बाजारवाटेने चढाई सुरू केली. सुरूवातीची वाट थोडीफार गवताने झाकली गेली असल्यामुळे जरा चुकामूक झाली. परंतु थोड्याच वेळात आम्हाला चांगली रूळलेली वाट गवसली. जावळी व दरे परिसरातील लोक नवीन महाबळेश्वरला बाजारहाट करण्यासाठी याच वाटेने ये जा करतात त्यामुळेच या वाटेला बाजारवाट असे नाव पडले असावे असा एक कयास. या वाटेवर मात्र जुन्या पायरीवाटेच्या बांधकामाच्या खुणा अगदी स्पष्ट दिसत होत्या. जशी वाट वर चढू लागली तशी चढाई अंगावर येऊ लागली. श्वास फुलू लागला. मनिषाला तिचा तळपाय एव्हाना चांगलाच त्रास देऊ लागला होता त्यामुळे आम्हा उभयतांची चाल मंदावली. बरं या वाटेवर एक नवीनच संकट उभं राहिलं…ते म्हणजे जळवा. जरा थांबावं म्हटलं तर जळू लागायची भीती. त्यामुळे हळू का होईना सतत चढाई चालू ठेवावी लागत होती. काळजी घेऊनही काहीजणांना जळवा लागल्याच. उन्हं उतरू लागली होती. संपूर्ण वाट जंगलातून असल्याने उन असे अजिबातच लागले नाही. जसे आम्ही वर जात होतो तशी महाबळेश्वरची आल्हाददायक थंड हवा प्रेमाने आम्हाला कवटाळत होती. चित्तवृत्ती उल्हसित होत होत्या. साडेचारच्या सुमारास आम्ही लॉडविक पॉइंटच्या गाडीवाटेवर येऊन पोचलो. येथून आमचे गंतव्य स्थान दीड किलोमीटर अंतरावर होते, तिथेच आमच्या गाड्या पार्क केलेल्या होत्या. आता मात्र हा शेवटचा टप्पा पार करायचे जीवावर आले होते. या वाटेवर पुन्हा एकदा आम्हाला महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरूने निरोपाचे दर्शन दिले.

संध्याकाळी पाचच्या सुमारास दहा तासाच्या अथक चालीनंतर आमच्या ऐतिहासिक व कस पाहणाऱ्या डोंगरयात्रेची सांगता झाली खरी पण जावळीच्या रानात गोवलेलं आमचं मन बाहेर पडायला नकार देत होतं, तन मात्र एव्हाना परतीच्या गाडीवाटेला लागलं….

ले. संदीप कुतवळ

सहभागी सदस्य

१. साकेत मिठारी२. हरीश कुलकर्णी३. ओम बर्वे४. संदीप कुतवळ५. मनिषा कुतवळ६. संदीप चौगुले७. प्रशांत वाजगे८. प्रमोद माने९. विनय जाधव१०. प्रसाद जाधव११. किरण ढमढेरे१२. जालिंदर कामठे१३. सचिन चौगुले१४. समीर कुडले

Leave a Reply