कोथळीगड अपरिचित नाळांची भटकंती

आजचा मार्ग:
मेचकरवाडीआंबेनळीचा झुरा (चढाई) ➝ बैलबारव ➝ चिंचेचा दारा (उतराई) ➝ बर्फाचा ओहोळ (चढाई) ➝ पेठ माची ➝ घळीची वाट (उतराई) ➝ धामणीमेचकरवाडी

▪ दिनांक: ३१ मार्च २०२४ (सोमवार)
▪ ठिकाण: मेचकरवाडी, कर्जत
▪ एकूण अंतर: १६ किमी
▪ एकूण उंची: साधारण ४०० मी.
________________________________________

एका अप्रतिम सफरीला सुरुवात:
नेहमीप्रमाणे, पुण्यातून लवकर प्रवास सुरू करण्याच्या पद्धतीनुसार झाली. मी २:२० ला घरातून टिंगरे नगर इथून निघून संगमवाडी येथे पाटील काकांना घेतलं आणि वारजे येथे साकेतच्या घरी गाडी लावली. ठरलेल्या वेळेत सकाळी ३ वाजता सर्व सदस्य जमले. साकेत चे वेळेचे गणित पक्के असल्यामुळे सकाळी ६:१५ वाजता, आम्ही मेचकरवाडी गाठलं. तिथे मंजीत माळवी आणि चंद्रकोर ट्रेकर्सची टीम आधीच पोहोचली होती. पहाटेचा गार वारा, अजूनही जागे होण्याच्या प्रयत्नात असलेले डोंगर, आकाश अजूनही हलकंसं काळसर होतं, ढगांआडून सूर्योदयाची चाहूल लागत होती आणि समोर उभा ठाकलेला सह्याद्रीचा रांगडा अवतार – हे सगळं बघूनच उत्साह दुपटीने वाढला. बूट घातले, व्यवस्थित सॅक लावल्या आणि मंजीत यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गाची प्राथमिक माहिती घेतली. अर्थात, ते आमच्यासोबत होतेच, पण संवाद साधण्याच्या आनंदासाठी विचारपूस झालीच! ६:३० वाजता, अखेर आमच्या ट्रेकला अधिकृत सुरुवात झाली, पहिल्याच पावलात जाणवलं, आज काहीतरी जबरदस्त अनुभवायचं आहे!

भटकंती विशेष: अनवट वाटांचा शोध
गेल्या रविवारीच आम्ही कोथळीगड परिसरात मंजीत माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली भटकंती केली होती. तेव्हा त्यांनी या नाळांबद्दल सांगितलं आणि तिथूनच या वाटांचा शोध घ्यायचा उत्साह दुपटीने वाढला. या नाळा ट्रेकर्सच्या यादीत फारशा नसल्या तरी साहस, निसर्गसौंदर्य आणि दुर्मिळ मार्ग यांचं आगळंवेगळं मिश्रण आहेत. कोथळीगड किंवा पेठचा किल्ला ट्रेकर्ससाठी ओळखीचा असला, तरी त्याच्या आजूबाजूच्या या नाळा तुलनेत कमी प्रसिद्ध आहेत—कदाचित त्यामुळेच त्यांचं नैसर्गिक सौंदर्य आजही तसेच टिकून आहे. पूर्वी गावकरी आणि व्यापारी प्रवासासाठी या वाटांचा उपयोग करत असत. मात्र आता या वाटा फारशा वापरात नाहीत, आणि म्हणूनच त्यांच्यात एक गूढ आकर्षण आहे. पावलागणिक जाणवतं की आपण इतिहासाच्या पायवाटांवरून चालतोय. आमचं नशिबच म्हणायचं, जोडीला मंजीत होते. या वाटांबद्दल त्यांचं ज्ञान अफाट! मध्येच एखादा गुगल मॅपपेक्षा अचूक अंदाज, तर कधी एखादी जुनी गोष्ट सांगून त्यांनी ट्रेक अजूनच रंगतदार केला. अनोळखी वाटांवर अशी अनुभवी साथ असणं म्हणजे नशीबवान असल्यासारखं!

1. आंबेनळीचा झुरा (चढाई)
आंबेनळीचा झुरा ही एक अनोखी आहे. सकाळच्या शांततेत हरवलेल्या या मार्गावर दाट झाडी, अरुंद कातळटप्पे आणि राकट सह्याद्रीची झलक अनुभवायला मिळते. “झुरा” म्हणजे अरुंद दगडी मार्ग, जिथे दोन्ही बाजूंना उंच कडे असल्यामुळेच कदाचित या वाटेला हे नाव मिळालं असावं. सुरुवातीला वाट अरुंद आणि दगडधोंड्यांनी भरलेली होती. काही ठिकाणी मोठ्या शिळांवरून चढाव लागत होता, तर काही ठिकाणी सरळसोट रॉक पॅचेस पार करावे लागत होते. अशा मार्गांवर चांगली पकड असलेले बूट अनिवार्यच! पावसाळ्यात ही वाट अधिक धोकादायक ठरते, कारण अरुंद भागांमध्ये घसरून पडण्याचा धोका मोठा असतो. हीच वाट पुढे कळकराई वाडीतल्या मळलेल्या वाटेशी जाऊन मिळते, जिथून सरळ कोथळीगडाकडे जाता येतं. या मार्गाचा वापर आजही गावकरी करतात, त्यामुळे आसपासच्या अनेक वाटा याच वाटेला येऊन मिळतात. वाटेत एका ठिकाणी मोठं आग्या मोहोळ दिसलं! मंजीत यांच्या अनुभवी नजरेतून ते सुटणार कसं? त्यांनी तात्काळ आम्हाला थांबण्याचा आणि शांत राहण्याचा इशारा दिला. अशा ठिकाणी प्रत्येक हालचाल जपून करावी लागते. वर पोहोचल्यानंतर मंजीत यांनी विचारलं, “बारव बघायचीये का?” आम्ही उत्साहाने होकार भरला. त्यांनी वरच्या बाजूच्या वाटेने जाण्यास सांगितलं. आणि हीच ती बैलबारव! या बारवेचं नाव ऐकताच कुतूहल जागं झालं. बैलबारव असं नाव पडलं त्यामागचं कारणही तितकंच रोचक होतं. पंचक्रोशीत बैलांचा मोठा बाजार बैलदरा येथे भरत असे, आणि बैलांची देवाणघेवाण याच परिसरात होत असे. बहुधा, प्रवासात बैलांना पाणी पुरवण्यासाठीच ही बारव बांधली गेली असावी. आश्चर्य म्हणजे, उन्हाळ्यातही या बारवेत मुबलक पाणी असतं! बारवेच्या सान्निध्यात थोडा वेळ विसावलो, अल्पोपहार घेतला आणि सह्याद्रीच्या कुशीत हा निवांत क्षण अनुभवला. पुढचा टप्पा अधिक आव्हानात्मक होता, पण त्या क्षणी फक्त निसर्गाच्या सान्निध्यात शांत बसण्याचा आनंद वेगळाच वाटत होता!

2. चिंचेचा दारा (उतराई)
थोडी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही पुन्हा वाटेला लागलो. काही वेळातच समोर सह्याद्रीच्या रांगांमध्ये खोलवर कोरलेल्या गवळण, म्हसोबा, आणि लुगडझाडी नाळा स्पष्ट दिसू लागल्या. खऱ्या ट्रेकरसाठी हे दृश्य म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं! या परिसरात इतक्या अप्रतिम वाटा असतील, याची कल्पनाच रोमांचक होती. “चिंचेचा दारा” या वाटेचं नाव कसं पडलं असेल, याचा आम्ही अंदाज बांधत होतो. चिंचेसारख्या वळणदार रचनेमुळेच हे नाव मिळालं असावं. ही एक नैसर्गिक खिंड असून कोकणात उतरण्यासाठी प्राचीन काळापासून वापरली जात होती. पण, वाट काही सोपी नव्हती—खालच्या बाजूला उतरताना झाडांच्या मुळांवर आधार घ्यावा लागत होता, तर काही ठिकाणी दगडांच्या कडांवर पाय घट्ट रोवावा लागत होता. अरुंद वाट आणि निसरडे कातळटप्पे अधिकच आव्हानात्मक वाटत होते.
या वाटेवर आणखी एक भन्नाट गोष्ट होती—मोठाले कातळ आणि काहीशे फूट उंचीचे रौद्रदर्शी फॉल! कातळावर उभं राहिल्यावर समोर दिसणारं निसर्गसौंदर्य जितकं लुभावणारं होतं, तितकंच वाटेतील आव्हान अंगावर रोमांच उभे करणारे होते. मन शांत ठेवत, योग्य ग्रिप घेत आम्ही एक-एक टप्पा पार करत होतो. संथ पण स्थिर पावलांनी अखेर चिंचेच्या दारातून उतरलो आणि पुन्हा मेचकरवाडीच्या हद्दीत पोहोचलो. थोड्याच वेळात आम्हाला एक कातळ विहीर दिसली. उन्हाने अंग तापलं होतं, त्यामुळे इथल्या थंडगार पाण्याने तोंड धुतलं, मुबलक पाणी भरून घेतलं आणि काही वेळ सावलीत विसावलो. थोडा ऊर्जेचा साठा करून आम्ही पुढच्या टप्प्यासाठी तयार झालो—“बर्फाचा ओहोळ” सर करण्यासाठी!

3. बर्फाचा ओहोळ (चढाई)
या नावामागचं कारण काय असावं, यावर आम्ही बरीच चर्चा केली आणि तर्क लावले. पहिल्या दोन्ही नाळांपेक्षा ही नाळ खूपच रुंद आणि मोठ्या टोळ दगडांनी भरलेली होती. आधी वाटलं की इथल्या पाण्याच्या प्रवाहाने दगड बर्फासारखे पांढरे दिसतात म्हणूनच बर्फाचा ओहोळ म्हणत असावेत. पण माझ्या मते, पूर्वी इथे मोठे झरे आणि ओहोळ असावेत, म्हणून हे नाव पडलं असावं. आजही, एवढ्या भर उन्हाळ्यातही काही ठिकाणी ओलसरपणा जाणवत होता. त्यामुळे चढताना अधिक काळजी घ्यावी लागली. २-३ ठिकाणी अंग रेलून चढाव लागत होता. काही ठिकाणी मोठे दगड टाकून त्यावरूनच पुढे जावं लागलं. तरीही हा मार्ग फारसा अवघड वाटला नाही. पण उन्हामुळे दमछाक होत होती. याच नाळेत एक असा टप्पा आहे, दिसायला हा टप्पा भीतीदायक, पण अनुभवी ट्रेकर्ससाठी तुलनेत सोपा होता. तरीही, तो पार करताना प्रत्येकाने एकमेकांना हात देऊन मदत केली. एकाने चुकून “अरे, हे चंदेरीसारखं दिसतंय!” म्हणताच आमच्या ट्रेक गँगमध्ये हशा पिकला. “चंदेरी”चा अनुभव घेतलाय ना आम्ही? त्यामुळे हे त्याच्या तुलनेत अजूनच सहज वाटलं!

ही वाट पार करताना सूर्य माथ्यावर येत चालला होता आणि उन्हाने आता जोर धरला होता. मोठमोठे दगड, त्यावर पडलेलं ऊन आणि पाण्याची वाफसर ओल यामुळे हा बर्फाचा ओहोळ आता आमच्यासाठी घामाचा ओघळ ठरला! एका क्षणी तर आम्हाला वाटलं, हे कधी संपणारच नाही की काय! पण संथ आणि स्थिर गतीने आम्ही वर सरकत राहिलो. ट्रेकमध्ये असंच असतं – डोकं शांत ठेवलं की कोणतीही वाट सोपी होते! अखेर, वर पोहोचताच आम्ही पेठ माचीवर येऊन थांबलो. इथे समोर दिसणारा कोथळीगड आता जणू आम्हाला टाळी देऊन म्हणत होता, “शाब्बास! पार केलंत!” दूरून सुळक्यासारखा दिसणारा कोथळीगड आता मात्र त्याच्या भव्यतेची साक्ष देत होता. पुढे जाताना एक कातळ विहीर लागते. इथे आम्ही पाणी भरून घेतलं, थोडे फ्रेश झालो. या आनंदातच आम्ही शिधा उघडली आणि मेजवानी सुरू झाली—चपाती, ठेचा, पुरणपोळी, शेंगदाणा चटणी, आणि सुका मेवा! एवढ्या दमछाकीनंतर पहिलाच घास घेताच वाटलं, “याच्यासमोर पंचतारांकित हॉटेल्स फिक्क्या वाटतील!” ट्रेकिंगमध्ये सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे हा—मैत्री, मेहनत, आणि मस्त जेवण! काही वेळ निवांत गप्पा मारल्या, अनुभव शेअर केले आणि मग निघालो पुढच्या टप्प्याकडे!

4. घळीची वाट (उतराई)
ही कोथळीगडावर जाणारी, ट्रेकर्समध्ये तुलनेने कमी परिचित असलेली वाट आहे. कोथळीगडाच्या माचीवरून उतरण्यासाठी नेहमीच्या मार्गाऐवजी हा मार्ग निवडला. वरतून येताना इथे वाट असेल असे सहज काळत नाही. अन ही वाट तुलनेने कमी वापरली जाते असे जाणवते, पण त्याचा ट्रेकिंगचा अनुभव विलक्षण आहे. सपाटीवरून अचानक खड्यात अशी काहीशी हि अरुंद घळ मध्ये उतरताच गार वारा अंगावरून जातो अन मन सुखावते. काहीशी घसरत हि वाट उतरायला सोप्पी आहे पण निसरड्या खडकामुळे आणि वसंत ऋतूच्या पाणगळीमुळे काळजी पूर्वक उतरावे लागते… जंगलाच्या रानवाटांमधून जाणारा हा मार्ग मधूनच निव्वळ अलिप्त उभ्या भिंतीसारख्या सह्याद्रीच्या कड्यांमध्ये हरवतो. कोणी नियमित या वाटेने येत नाही, त्यामुळे वाट शोधण्यास वेळ लागतो. सुमारे तासाभरात आम्ही धामणी गावाच्या हद्दीत दाखल झालो. अन हि वाट दिसेनाशी होते आणि काळतही नाही आपण नक्की कुठून आलोत. इथे धमनीत खासगी रिसॉर्ट सदृश्य जागेत येऊन पोहोचतो. पूर्वचा नियोजित गाडी धमनीत येऊन थांबली होती, मागे ३ किमी मेचरवाडीत मंजीत माळवी आणि त्यांच्या सहकार्यांना सोडायचे होते आणि तिथे जाऊन आम्ही पण एका हापशी वर छान अंघोळ करायची होती म्हणून आम्ही परत मेचकरवाडीत आलो, मंजित आणि चंद्रकोर टीम चा निरोप घेतला. बाकी आम्ही सगळ्यांनी मस्त अंघोळ केली आणि प्रवासाचा शीण दूर केला. त्यानंतर पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला, आठवणींची शिदोरी भरून!

सहकारी:

पुणे टीटीएमएम सदस्य:
१. साकेत मिठारी
२. संदीप चौगुले
३. डॉ. रामेश्वर कविटकर
४. हरीश कुलकर्णी
५. प्रभाकर पाटील
६. जालिंदर कामठे
७. संतोष आलम
८. श्याम कानिटकर
९. मुकुंद पाटे
१०. अमोल चौधरी 
११. महादेव गदाडे
१२. दीपक पाटील
१३. सागर शिवदे
१४. मी प्रवीण पावडे

मुंबई चंद्रकोर ट्रेकर्स सदस्य:
१. नारायण धनावडे (गिरगाव)
२. विवेक चौधरी (मुलुंड)
३. गौरव गावणकर (विक्रोळी)
४. राजश्री कामत (विद्याविहार)
५. मंजीत माळवी (बदलापूर- आमचे सारथी)

Leave a Reply