कोकणदिवा

कोकणदिवा
दिनांक – 14 एप्रिल 2024
आज एका घनदाट जंगलातुन जाणाऱ्या मार्गाने कोकणदिवा या किल्ल्याची सफर केली. अनेक वर्षांपासून या किल्ल्याचे नाव ऐकून होतो. टी टी एम एम तत्वावर आम्ही 11 जण यात सहभागी झालो.
हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे. पहाटे साडेपाच वाजता पुण्यातून दोन गाड्यातून आम्ही सिंहगडच्या जवळूनच कोकण दिव्याकडे निघालो. पुण्याहून कोकणदिव्या पर्यंतचे अंतर साधारण 80 किलोमीटर आहे. या ट्रेक साठी दोन पर्याय आहेत, एकतर घोळ या गावातून चालत पायथ्याशी पोहोचायचे नाही तर आणखीन थोडी पुढे गाडी नेऊन गाजराईवाडी या गावातून चालत जाऊन पायथ्याशी पोहोचायचे. आम्ही गाजराईवाडी मध्ये गाड्या नेऊन तेथे नाश्ता करून तिथून चालत कोकण दिव्याच्या मुख्य डोंगराच्या पायथ्याशी निघालो. हा बहुतेक मार्ग अतिशय दाट जंगलातून आहे. मला पूर्वीच जंगल ट्रेकची माहिती मिळाली होती. जसा किल्ल्याचा मुख्य डोंगर येतो तसे तेथे चढणीची वाट सुरू होते या वाटेवर काही ठिकाणी घसारे आहेत मात्र चढताना त्याचा जितका त्रास होत नाही तितका उतरताना थोडे काळजीपूर्वक उतरावे लागते. मात्र ट्रेकिंगची सवय असलेल्यांना हे आव्हान सोपे आहे. मात्र तरीही उन्हाळ्याचे दिवस असल्याने या ट्रेकने चांगलेच दमवले. कोणी हा ट्रेक करणार असेल तर सोबत नाश्ता जेवणाची पाकिटे तसेच भरपूर पाणी सोबत अवश्य ठेवावे. कारण गाजराईवाडी गावात नाश्ता व जेवणाची खास सोय नाही. तसेच पानशेतहून पुढे निघालो की वाटेत कुठेही खाद्यपदार्थांची दुकाने नाहीत. जसे किल्ल्याच्या माथ्याच्या खाली येतो तिथे एक गुहा आहे तिथेच थोडी विश्रांती घेऊन आम्ही माथ्याकडे निघालो. कोकणदिव्याचा माथा खूप छोटा आहे तसेच अरुंदही आहे. येथे किंचित जपून चालावे लागते आणि टोकाच्या भगव्या झेंड्याकडे जायचे. माथ्यावर किल्ले पणाचे विशेष अवशेष नाहीत मात्र वाटेत त दोन-तीन पायऱ्यांच्या पुसट खुणा दिसतात. माथ्यावरून रायगड, मंगळगड, लिंगाणा, तोरणा असे काही किल्ले दिसतात. रायगडच्या माथ्यावरील बाजारपेठ नगरखाना तसेच जगदीश्वर मंदिराचा कळस या गोष्टी किंचित बारकाईने पाहिल्यास ओळखता येतात. तसेच महादरवाज्याची वाट, टकमक टोक हेही दिसतात. या वरील किल्ल्यांपैकी मंगळगड सोडल्यास बाकी किल्ले आज नीट दिसून आले. इथे फोटोसेशन भरपूर होते. एका बाजूला वेल्हे तालुका तर दुसऱ्या बाजूला कोकणात उतरणाऱ्या अक्राळ विक्राळ दर्या आणि अजस्त्र डोंगर असे दिसतात. नावाप्रमाणेच हा किल्ला जणूकाही कोकण प्रदेशावर प्रकाश टाकणारा दिवा आहे. गुहे कडून या माथ्यावर जाणारी वाटेवर एक रॉक पॅच आहे तो किंचित काळजीपूर्वक चढावा लागतो अर्थात पावसाळ्यात हा थोडा धोकादायक होईल.
माथ्यावरून पुन्हा थोडे खाली उतरून मगासच्या त्या गुहेत जाऊन बसलो आणि पेट पूजा केली आणि मगच गड उतरून पुन्हा त्या विस्तीर्ण पठाराच्या वाटेने दाट जंगलातून गारजाई वाडी कडे निघालो. थोडी विश्रांती घेऊन गाड्यांमध्ये बसून कोकण दिव्याचा निरोप घेत पुण्याकडे निघालो. दुपारी अगदी वेळेत म्हणजे चार वाजताच पुण्यात पोचलो.
एकंदरीतच एका दिवसात सहज होणारा हा ट्रेक आहे खास करून पुणेकरांसाठी. जंगल ट्रेक आणि माथ्यावरून दिसणारा कोकणचा विलोभनीय प्रदेश अनुभवायचा असेल तर हा ट्रेक एकदा तरी जरूर करावा. आजच्या आमच्या ग्रुपमधील अकरा जणांपैकी काहीजण माझ्या ओळखीचे होते तर काही ची नवीनच ओळख झाली. एसटीएफ या ग्रुप सोबत मी दोन वेळा किल्ले ट्रेकिंगसाठी नाशिक ट्रिप केली होती त्या ग्रुपचे एक प्रमुखांपैकी एक श्री संदीप कुतवळ हे सुद्धा आजच्या मोहिमेत होते. आजच्या संपूर्ण ट्रेक मध्ये आमच्या व्यतिरिक्त एकच ग्रुप होता जो आम्ही गड उतरत असताना ते गड चढत होते त्यात काही लहान मुलेही होते हे पाहून विशेष कौतुक वाटले. माझ्याकडील ऐतिहासिक ग्रंथांमध्ये कोकणदिव्याचा उल्लेख कुठेच सापडला नाही मात्र असे समजले की या किल्ल्याच्या नजीकची कावल्या बावल्या खिंड आहे तिथे 1689 मध्ये गोदाजी जगताप व सर्कले नाईक यांनी मुघलांविरुद्ध युद्ध केले होते.
गेल्या काही ट्रीप प्रमाणेच हा ट्रेक सुद्धा तसा अचानकच ठरला होता मात्र तरीही त्या ट्रीप प्रमाणेच हाही ट्रेक सुंदररीत्या घडून आला याबद्दल सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार🙏
– सारंग विठ्ठल गोंधळेकर
१४ एप्रिल २०२४

Leave a Reply