घोसाळगड आणी तळागड

घोसाळगड आणी तळागड
पुन्हा एकदा कोकण. आज रायगड जिल्ह्यातील अनुक्रमे रोहा आणि तळा या तालुक्यातील घोसाळगड आणी तळागड या किल्ल्यांची भ्रमंती केली. पहाटे साडेपाच वाजताच तळेगाव मधून कोकणच्या दिशेने प्रस्थान केले. आम्ही एकूण पाच जण होतो. ज्याच्या गाडीतून गेलो होतो वारजेतील साकेत मिठारी Saket Mithari याच्यासोबत माझा हा दुसरा, तर चिंचवडचे कुलकर्णी काका Shashikant Govind Kulkarni यांच्यासोबत तिसरा आणि ____ मॅडम यांच्यासोबत माझा हा चौथा ट्रेक होता. केवळ कुलकर्णी काकूंसोबतच प्रथमच परिचय झाला.
घोसाळेगड: आजच्या ट्रेकचा परमोच्च क्षण म्हणजे आमच्या सोबत श्री राहुल किणीकर हे त्यांच्या दुचाकीवरून खास आमच्यासाठी दोन्ही गडांवर आले होते. हे तेच rahul kinikar किणीकर ज्यांनी आम्हाला गेल्या आठवड्यातील कोकण सहलीसाठी मार्गदर्शन केले होते. त्यांचा स्वतःचा ऑटोमोबाईल चा व्यवसाय आहे त्या व्यापातून वेळ काढून आणि तेही त्यांच्या स्वतःच्या गाडीवरून ते दोन्ही गडांवर आम्हाला मार्गदर्शनासाठी आले होते. त्यांच्यामुळे आज आमचा वेळही वाचला, महत्त्वपूर्ण माहितीही मिळाली आणि मुख्य म्हणजे त्यांची भेट झाली ही फार मोठी पर्वणी ठरली. त्यांनी आजपर्यंत साडेतीनशे किल्ल्यांची भ्रमंती केली आहे. यामध्ये महाराष्ट्रा बाहेरील पन्नास एक किल्लेही समाविष्ट आहेत. सकाळी ९.१५ वाजता आम्ही घोसाळेगड चढायला सुरुवात केली. हा उंचीने खूपच छोटा किल्ला आहे. केवळ वीस ते पंचवीस मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो. गडाच्या उजवीकडे तटबंदी थोडीफार शाबूत आहे. गडाच्या बालेकिल्लाला पूर्ण वळसा घालून आपण एका पाण्याच्या टाक्यापाशी येतो. गडावर काही तोफा पाण्याची टाकी असे पाहायला मिळते. मात्र गडाच्या बालेकिल्ल्यावर जाणे थोडे जिकरीचे आहे. वाट घसरडी असल्याने तसेच रॉक पॅच असल्याने आम्ही तेथे जाणे टाळले. पायथ्याशी असलेल्या घोसाळे या गावावरून याला घोसाळे गड असे म्हणले जाते. गडाच्या माथ्यावरूनच लांबवर दिसणारा तळेगड खुणावत होता जो आमचा पुढचा ट्रेक होता.
तळेगड: श्री किणीकर हे रोह्यामधून दहा किलोमीटर घोसाळगड पर्यंत आणि नंतर तिथून आणखीन पुढे दहा किलोमीटर तळेगडपर्यंत आमच्यासोबत आले. पायथ्याशी असलेल्या तळा किंवा तळे या गावावरून याला तळेकर असे म्हणतात. याशिवाय तळगड किंवा तळागड असेही म्हणतात. हा किल्ला घोसाळेपेक्षा आकाराने आणि उंचीने मोठा आहे. याच्या माथ्यावर जायला आम्हाला साधारण 30 ते 35 मिनिटे लागली. पहिला हनुमान दरवाजा पार करून गेल्यानंतर पुढे एका टोकावर तोफा ठेवलेल्या आहेत. थोडे वर गेल्यानंतर पुन्हा एक दरवाजा लागतो त्यानंतर आपण किल्ल्याच्या माथ्यावर प्रवेशतो. या किल्ल्याची तटबंदी थोडीफार शाबूत आहे त्याशिवाय याच्या माथ्यावर सलग एका ओळीत अनेक पाण्याची टाकी खोदलेली आहेत. याच्या माचीकडे बघताना काहीशी तोरण्याच्या झुंजार माचीची आठवण येते. आम्ही तटबंदीवर मनसोक्त फिरून आणि फोटोसेशन करून गड उतरायला लागलो. उतरताना हनुमान दरवाजाच्या थोडे पुढे एका जागी सावलीत जेवायला बसलो. सोबत अर्थातच किणीकर सरही होते. सरांच्या मार्गदर्शनामुळे आमचा बराच वेळ वाचला असल्यामुळे पुढे आणखीन काही किलोमीटर जाऊन पुढे कुडेगाव मधील कुडे लेणी याही पाहून घेतल्या. पुढे ३० किमी अंतरावर बिरवाडी हा किल्लाही होता. परतताना किणीकर सरांनी पुढच्या वेळी माझ्या घरी मुक्कामाला या आणि दोन दिवसात बिरवाडी, जंजिरा असे काही चार एक किल्ले पाहून जा असे आग्रहाने सांगितले. आम्हीही त्यांना पुणे परिसरात आमच्या आमच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले आणि पुढे लेणी पाहून परतीच्या मार्गाला लागलो.
हे दोन्हीही गड पुरंदरच्या तहातील बारा किल्ल्यांपैकी आहेत जे शिवाजीराजांकडेच स्वराज्यात राहिले. तसेच पुढे कोंडाजी फर्जंदला जंजिऱ्याच्या स्वारीवर पाठवताना संभाजीराजे घोसाळे गडावर आले होते असा उल्लेख किणीकर सरांनी मला सांगितला. दोन्हीही किल्ले चढायला तसे सोपेच आहेत मात्र तीव्र उन्हामुळे गेल्या आठवड्यातील सहलीप्रमाणेच यात थोडे आव्हान निर्माण झाले होते.
एकूणच पाहता सलग दोन आठवडे कोकणातील दोन भिन्न ठिकाणातील दुर्गसहली या मनसोक्त आनंद, नवीन मित्र तसेच किणीकर सरांसारखे मार्गदर्शक देऊन गेल्या. गेल्या पुर्ण वर्षात ३२ किल्ल्यांचे ट्रेक झाले तर यावर्षी एप्रिलपर्यंतच ३१ किल्ले पाहून झाले.
आज जाताना खंडाळा घाट उतरल्यावर पुढे लगेच घरून फोन आला व खंडाळ्यातील बस दुर्घटनेची बातमी समजली. या घटनेतील सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
– सारंग विठ्ठल गोंधळेकर
१५ एप्रिल २०२३

Leave a Reply