काळ्या कातळातला ‘चंदेरी’
ठाणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर, माथेरान डोंगर रांगेत अनेक आकाशाला भिडणारे सुळके व किल्ले आहेत. यातल्या विकटगड, प्रबळगड व कलावंतीण, इर्शाळगड या किल्यांचे ट्रेक्स आधी केले आहेत. या सर्व किल्ल्यानवरून श्री मलंग गडावरून सुरु होणारी डोंगररांग आपले लक्ष वेधून घेते. या डोंगर रांगेत तवली, नवरा-नवरी-वऱ्हाडी, मलंगगड, म्हैसमाळ आणि चंदेरी ही गिरीशिखरे येतात.
चंदेरी किल्याचा ट्रेक करायची इच्छा गेल्या दोन वर्षांपासून मनात होती. मिचोँग वादळा मुळे या आठवड्यात ठरलेला चेन्नई दौरा रद्द झाला आणि तो सुवर्णयोग साधून चंदेरी ट्रेक चा प्लॅन ठरला.
नेहमी प्रमाणे लवकर उठून पहाटे ४ ला आम्ही पुण्याहून प्रयाण केले. खोपोली – कर्जत – नेरळ – वांगणी मार्गे चिंचवली या पायथ्याच्या गावी अंदाजे अडीच तासात पोहोचलो. गावातून आधी ठरवलेला वाट्याडा घेऊन सुमारे ६.४५ ट्रेक ला सुरवात केली.
अंदाजे अर्धा तासाच्या सौम्य चढाई नंतर आपण एका विस्तीर्ण पाठरावर येऊन पोहोचतो. याच्यापूढे चंदेरी आणि म्हैसमाळ या दोन शिखरांच्या बेचक्यात पोहोचायला तासाभराची खडी चढाई करावी लागते. याच बेचक्यात पनवेल मार्गे तामसाई गावातून येणारी पायावट विरुद्ध दिशेने येऊन मिळते. या बेचक्यातून उजवीकडे म्हैसमाळ तर डावीकडे जाणारी वाट चंदेरी किल्याला घेऊन येते.
सुमारे अर्ध्या तासात आपण उभ्या कातळात खोदलेल्या गुहेपाशी येऊन पोहोचतो.
गुहेमध्ये एक लहानसे शिवलिंग आहे. शिखरमाथा गाठायला गुहेच्या उजव्या बाजूने ट्रॅव्हर्स मारून कातळकड्याला भिडावे लागते. कातळ टप्पा पार करायला कातळात काही कपारी आणि पायऱ्या खोदलेल्या आढळतात. गुहेपासून माथ्यापर्यंत पोहोचायला अंदाजे अर्धा तास लागतो. माथ्यावर पोहोचायच्या आधी आपल्याला कातळात खोदलेल्या चौक्या आणि एका पाण्याची टाकी आढळते.
गडमाथा अगदीच निमूळता असून, काही गिरीप्रेमीन्न्नी छत्रपतींची मेघडंबरी पुतळा बसवला आहे. गडमाथ्यावरून सह्याद्रीच्या उत्तुंग गिरीशिखरांचे विलोभनीय दृश्य न्याहाळून आम्ही उतरायला सुरवात केली. परतताना गुहेत न्याहारी आणि थोडी विश्रांती घेऊन दोन तासात सुमारे दुपारी अडीचला चिंचवली गाठले.
आक्रमकांपासून राज्याचे रक्षण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी सह्याद्रीच्या अनेक शिखरांवर किल्ल्यांच्या रुपात तटबंदीचे कोंदण चढवले. काही दुर्ग, तर काही फक्त चौकीची ठिकाणे. काही गडांवर जाणारे मार्ग सोपे, तर काही गडांवर जाणारे मार्ग अतिशय अवघड.
चौकीचे ठिकाण आणि अवघड मार्ग यांचे मिश्रण म्हणजे चंदेरी किल्ला होय.
तीव्र चढाई, गुहेच्या पुढच्या टप्प्यात असलेला घसारा, आणि ९० अंशात असलेले कातळारोहण यामुळे चंदेरी किल्याचा ट्रेक अवघड श्रेणित मोडतो.
…. शिरीष गोडबोले
टीप –
१) गुहेच्या पुढे एका जागी तीव्र घसारा असून, हा टप्पा पार करणं जिकरीच आहे. आम्ही दोर सोबत ठेवला होता पण आमच्यातले सगळे सराईत असल्यामुळे दोर लावावा लागला नाही. नवख्या ट्रेकर्स नी दोर लावल्या शिवाय हा टप्पा पार करू नये.
२) चिंचवली गावातील गाईड – श्री तुकाराम गावंडे
7743831158/ 7083612273