भोरगिरी – भोरगिरी किल्ला – गुप्त भीमाशंकर – भीमाशंकर – आणि परत भोरगिरी.
किल्ले भोरगिरी ह्या छोटेखानी किल्ल्याबद्दल फारसा इतिहास आढळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मोगल सामाराज्याची सरहद भीमा नदीपर्यंत भिडलेली होती. भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकरजवळ होतो. तेथून ती राजगुरुनगर येथे येते. या भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये किल्ले भंवरगिरी ऊर्फ भोरगिरी विसावला आहे. पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग अनुभवता येतो. भोरगिरी ते भीमाशंकर एक सुंदर ट्रेक आहे. डोंगरधारेजवळून रमतगमत करता येणारा. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे पाहायला मिळतात.
गुप्त भीमाशंकर -भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर. भगवान शंकराचे हे धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.
नेहमीप्रमाणे आम्ही लवकर सकाळी 4 वाजता वारजे येथून निघालो आणि साधारण 6:30 वाजता भोरगिरी ला पोहचलो. थोड्या वेळाने आमचा वाटाडया मंगेश आम्हाला भेटला आणि सात वाजता ट्रेक ला सुरवात केली. आम्ही परत भोरगिरीला येणार असल्याने वेळेची मर्यादा ठेवून ह्या ट्रेक चे नियोजन केले होते आणि सर्वजण चालणारे होते. पहिला आम्ही सुरवात केली ती किल्ले भोरगिरीच्या चढाईने. भोरगिरीतून अतिशय छोटा असणाऱ्या अशा भोरगिरी चढाईस सुरवात केली आणि साधारण पंधरा मिनिटात आम्ही मंदिराजवळ पोहचलो. भोरगिरी वरून दिसणारा फेसाळ धबदबा डोळ्याचं पारणं फेडणारा होता आणि वाटत होत तिथंच बसून राहावं पण वेळेची मर्यादा असल्याने थोडा वेळ छायाचित्रीकरण करून काढता पाय घेतला आणि मंदिरापासून वर आम्ही गड माथ्याकडे निघालो. साधारण दहा मिनिटात माथ्यावर पोहोचलेलो . गडावर पाहण्यासाठी म्हणजे गुहेतील शिव मंदिर , गुहेतील देवीचे मंदिर , पाण्याचं टाक , आणि काही पुरातन बांधकामाचे अवशेष आढळतात. थोडा वेळ थांबून आम्ही गुप्त भीमाशंकर कडे कूच केली. असंख्य धबधबे , पुढं सरकणारे धुकं , गर्द झाडी , पक्षांचा किलबिलाट , वाऱ्याचा सुळसुळाट , रिम झिम पावसात झाप झाप चालत साधारण 9:15 वाजता गुप्त भीमाशंकर येथे पोहचलो . दर्शन घेतलं , धबधब्याखाली बसून चिंब भिजून लागेचच भीमाशंकर कडे जायला निघालो आणि साधारण दहा वाजता मंदिराजवळ पोहचलो . खूप गर्दी होती आणि परत भोरगिरी ला जायचे असल्याने शिखर दर्शन घेऊन परतीचा मार्ग पकडला. वाटेवर हॉटेल मध्ये थांबून घरून आणलेले डबे, मिसळ आणि पोह्यावर ताव मारत होतो आणि तोपर्यंय पावसाने चांगलाच जोर पकडला होता. यथेच्य पोट पूजा करून परतीच्या मार्गाने वेग पकडला होता आणि ह्यावेळी मंगेश ने आम्हाला दुसऱ्या वाटेनी नेलं . त्यामुळे आम्हाला दोन्ही वाटा अनुभवता आल्या. येताना फोटो काढत , चिंब भिजत , धबधब्याचा पूर्ण आनंद घेत गाठली ती थेट भीमा नदी. भीमेत डुंबून आमचा पूर्ण क्षीण नाहीसा झाला. यथेच्य डुंबून झाल्यावर मंगेश चा निरोप घेऊन आम्ही पुण्याकडे रवाना झालो. मध्ये परत मिसळ , भेळ आणि फक्कड चहा घेऊन झालेल्या ट्रेक वर चर्चा करत असंख्य आठवणीं नी साधारण साडे चार वाजता वारज्यात पोहचलो .
असा हा अद्भुत निसर्गाचा अविष्कार असलेला आणि डोळ्याचं पारणं फेडणारा जंगल ट्रेक !
भेटूया लवकरच पुढच्या मोहिमेला .
हरीश कुलकर्णी
साकेत मिठारी
शंकर लंगोटे
संजय काळे
मनिष वाळके