मोहनगड, कावळागड, मंगळगड, दौलतगड
यावेळी दोन दिवसांत ४ किल्ले पाहून झाले. आम्ही एकूण ५ जण रविवारी पहाटेच पुण्यातून भोरच्या दिशेने निघालो आणि वरंधा घाटाच्या थोड अलीकडे असलेल्या मोहनगडाच्या जवळ पोचलो.
मोहनगड: याला शिवकाळात जासलोडगड किंवा चासलोडगड असेही नाव होते. तसेच माथ्यावर असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिरामुळे याला जननीदुर्ग असेही म्हणतात. तसेच पायथ्याशी असलेल्या दुर्गाडी या गावामुळे दुर्गाडीचा किल्ला असेही म्हणतात. या दुर्गाडी गावात आम्ही आमची चारचाकी पार्क करून ट्रेक चालू केला. तसेच गावातील श्री कोंडीबा गोरे यांना आमचा वाटाड्या म्हणून घेतले. मोहन गड उंचीने काही कमी नाही. याची वाट चढणीचीच असली तरी बरीचशी जंगलातूनच आहे. गोरे काकांमुळे आम्हाला फार कुठे अडचण आली नाही आणि दीड तासात गडाच्या माथ्यावर पोहोचलो. गड माथ्यावर पाहण्यासारखे असे विशेष फार नाही. केवळ एक जननी मातेचे मंदिर आणि किरकोळ अवशेष आहेत. मात्र मोहनगडावरून सह्याद्रीतील काही किल्ले तसेच डोंगररांगा याचे उत्कृष्ट मिश्रण होऊन दृश्य दिसते. राजगड, तोरणा, पुरंदर, रायगड, कावळ्या, मंगळगड असे काही किल्ले इथून दिसतात. गडावरून उतरतानाची वाट आम्ही दुसरी निवडली आणि ती आणखीन दाट जंगलातून होती. गोरेकाकांच्या मदतीमुळे आमचा मोहनगडाचा ट्रेक वेळेत पुर्ण झाला. पायथ्याशी गेल्यावर काही वेळ गोरेकाकांच्या घरात बसून त्यांनी आम्हाला ताक प्यायला दिले. शेजारीच गोठा असून तिथे गाई, बैल, कोंबड्या, दोन-तीन कुत्री असा सगळा गोतावळा असतो. छान मजा आली.
खर म्हणजे मोहनगड २००८ सालापर्यंत कोणाला ठाऊकच नव्हता. त्याला प्रकाशात आणण्याचे श्रेय पुण्यातील दुर्गसंशोधक श्री सचिन जोशी व त्यांच्या टीमला जाते. मोठ्या परिश्रमाने त्यांनी इथे किल्ला आहे हे पुराव्यानिशी शोधले. इस १६५९ सालच्या मे महिन्यात शिवाजीराजांनी बाजीप्रभूंना एक पत्र पाठवले त्यात मोहनगड म्हणजेच जासलोडगडचा उल्लेख आहे. त्यात ते बाजीप्रभूंना किल्ला मजबूत करून अलंगा (देवडी) मजबूत ठेवायला सांगतात. ही सगळी पुढे झालेल्या अफजलखान वध व जावळीतील युद्धाची तयारीचाच भाग असावा.
कावळागड: याचे नाव मी २०१० मधेच एका ब्लॉगवर वाचले होते. याला नजरबाज कावळ्या असेही म्हणतात. मोहनगड करून आम्ही लगेच वरंधा घाटातील कावळागडाकडे निघालो. त्याआधी घाटातच जेवण केले. घाटरस्त्यामुळे हा किल्ला दोन भागात विभागला गेला आहे. डावीकडे देवीच्या मंदिराच्या वर किल्ल्याचा भाग आहे आणि पाण्याची टाकीही आहेत. मात्र देवीचे मंदिर आम्हाला दिसलेच नाही त्यामुळे आम्ही डावीकडील भागच पाहिला आणि तोच जास्त मोठा, थ्रिलिंग व पाहण्यासारखा आहे. पुढे ‘कावळा’ माझ्या पिंडीला शिवेल की नाही हे सांगता येत नाही पण निदान मी कावळ्याला शिवून आलो असे तरी म्हणू शकतो. उजवीकडील टोकाकडील बुरूजावर जाणारी वाट बरीचशी अरूंद आहे तसेच वाटेत चढ उतारही आहेत. अवशेष जवळपास नाहीतच. मात्र बुरूजावरून वरंधा घाट व रस्ता, मंगळगड, शिवथरघळ हे दिसतात. तसेच राजगड व तोरणा स्पष्ट दिसतात. खाली कोकणातील दृश्यही सुंदर दिसते. घाटातून कावळ्यावर यायला आम्हाला जवळपास एक तास लागला. ही बुरुजापर्यंत जाणारी वाट अरुंदच आहे त्यामुळे थोडासा डोंगराच्या बाजूने शरीराचा झोक ठेवून चालावे लागते. हा कावळा कोकण प्रदेशावर लक्ष ठेवून आहे याचे नाव बहुदा त्यामुळेच नजरबाज कावळ्या असे पडले असावे. यानंतर आम्ही मुक्काम शिवथरघळ येथील एका गेस्ट हाऊसमधे केला. त्याआधी शिवथरघळीचेही दर्शन घेऊन आलो.
मंगळगड: काल पहाटे ५.३० वाजताच मंगळगडाकडे प्रस्थान केले. या ट्रिपसाठी निघण्याच्या आधीच मी जेव्हा या चारही किल्ल्यांची माहिती काढत होतो तेव्हाच समजले होते की मंगळगड हा तसा मोठा ट्रेक आहे आणि तसेच झाले. या मंगळगडाने आमची काहीशी परीक्षाच पाहिली. कोकणची हवा त्यात परत उन्हाळ्याचे दिवस, शिवाय गडाची तीव्र चढण यामुळे हा गड कस पाहतो. मी आत्तापर्यंत केलेल्या किल्ल्यांच्या ट्रेकपैकी प्रबळगड आणि आता हा मंगळगड या दोन किल्ल्यांनी चांगलेच दमवले मित्रांनो. मात्र तरीही या किल्ल्याला भेट द्यायलाच हवी हा… याच्या पायथ्याशी कांगोरी हे गाव आहे तसेच माथ्यावर कांगोरी देवीचे मंदिर आहे म्हणूनच याला कांगोरीचा किल्ला असेही नाव आहे. किंबहुना याच नावाने बरेच लोक त्याला ओळखतात. या गावातून एक डांबरी रस्ता चालू होतो जो वळणवळण घेत जरा लॉंग कटने एका टप्प्यापर्यंत तुम्हाला आणून सोडतो. आमची गाडी तेथपर्यंत नेता आली असती मात्र सध्या त्याचे अजून पुढे पर्यंत काम चालू असल्याने तिथे वाट बंद केली आहे त्यामुळे आम्ही पायीच निघालो. मात्र मध्येच एके ठिकाणी आम्ही एक शॉर्टकट घेतला आणि एका घसाऱ्याच्या वाटेने आणि तीव्र चढणीने गडाच्या नाकडापर्यंत पोचलो. इथून एक अरुंद वाट डावीकडून गडाच्या मधल्या टप्प्यापर्यंत पोहोचते. गडावर अवशेष थोडेफार आहेत तसेच काही शिल्पही आहेत कांगोरी देवीचे मंदिर एका टोकाला आहे ते जरूर पहावे. पाण्याची टाकी भरपूर आहेत. गडाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जायला म्हणजेच तेथील बुरुजावर जायला थोडेसे आणखीन एक टेकाड चढून जावे लागते. गडाच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहिले असता सह्याद्रीचे उत्तम दृश्य दिसते. राजगड, तोरणा, कावळागड, प्रतापगड, मकरंदगड, महाबळेश्वर, वरंधा घाट आणि बरेच काही दिसते. गड मनसोक्त फिरून आणि अर्थातच फोटो सेशन करून आम्ही दुसऱ्या वाटेने खाली उतरायला सुरुवात केली. ही वाट सुरूवातीला १०-१५ मिनिटे अरुंदच आहे. नंतर मात्र बाजूने झाडी आहेत त्यामुळे अरुंद जरी असली तरी तेवढी काळजी वाटत नाही. मात्र शेवटच्या टप्प्यात एका ठिकाणी एक घळ किंवा धबधब्याची वाट खाली जाते. खरं म्हणजे दोन ठिकाणी असे टप्पे आहेत. आम्ही त्यातील दुसरी धबधब्याची वाट पकडून खाली उतरायला लागलो. ही वाट दमवणारी आहे आणि गड चढताना ही वाट नक्कीच आणखीन दमवणारी असणार. छोटे मोठे असे अजस्त्र दगड तसेच पालापाचोळा असे पार करत आम्ही एकदाचे खालच्या गावात पोचलो मात्र आमची गाडी मात्र आम्ही दुसऱ्या बाजूला लावली होती म्हणून साकेत ज्याची गाडी होती तो एका टेम्पो मधून पाठीमागे जाऊन त्याने आमच्यासाठी गाडी पुढे आणली. इथून नंतर महाडमध्ये जेवण करून आम्ही आमच्या शेवटच्या किल्ल्याकडे निघालो तो म्हणजे दासगाव येथील दौलतगड.
दौलतगड: हा अगदीच छोटेखानी किल्ला आहे उंचीने फार कमी आहे याच्या पायथ्याशी दासगावची वस्ती आहे. याला दासगावचा किल्ला असेही म्हणतात. जवळच सावित्री नदी आणि त्यावरील असलेला कोकण रेल्वेचा पूल तसेच नदीमार्ग वळणे घेत गेल्यामुळे दोन तयार झालेली बेटे आहेत. सुरुवातीला दासगावची वस्ती लागते तेथे तीन चार ठिकाणी किल्ल्यावर जाण्याचा मार्ग विचारावा लागतो. वस्तीमधील घरांच्या पुढून मागून असे वळणे घेत घेत शेवटी आपण किल्ल्याच्या डोंगराला लागतो. वस्तीमधील पहिल्या घरापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत जायला साधारण वीस मिनिटं लागतात. वरती फार काही बघण्यासारखे नाही. एक दोन पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याचे अवशेष असे दिसत नाहीत. गडावर दाट रान माजले आहे तसेच कापसाची काही झाडे आहेत. मात्र या गडावरून आजूबाजूचे विहंगम दृश्य दिसते. नेमकं त्याच वेळी नदीवरील पुलावरून रेल्वे जात होती ती सुद्धा कॅमेर्यात टिपली. या गडावरून सोनगड दिसतो. या गडावर फार वेळ न घालवता आम्ही उतरून परतीच्या प्रवासाला लागलो. मात्र त्याआधी वस्ती मधील एका घरात निवाते नावाच्या एका कुटुंबाने आमची विचारपूस केली. आम्हाला माठातील थंडगार पाणी तसेच कोकम सरबतही आग्रहाने दिले. या वस्तीमध्ये प्रामुख्याने भोईर समाजाचे लोक राहतात. शिवाजीराजांची पालखी उचलण्याचा मान यांना होता असे निवाते कुटुंबातील एका महिलेने आम्हाला सांगितले.
यानंतर थोड्याच वेळात तो क्षण आला जो ट्रेकिंग मधील माझा न आवडणारा क्षण आहे. तो म्हणजे ट्रेकिंग वरून परतण्याचा क्षण. जाताना वरंधा घाटातून गेलेलो आम्ही येताना मात्र तामिनी घाटातून परतलो.
थोडक्यात हे चार किल्ले म्हणजे रायगडचे संरक्षकच आहेत. रायगडाच्या प्रभावळीतीलच आहेत जणू. या सहलीमधील माझे चार सोबती म्हणजे ज्याच्या गाडीतून गेलो होतो तो साकेत, ज्याच्या घरी मुक्काम केला तो दिनेश, तसेच आकाश आणि पियुष हे होत. पियुष सोडून बाकी तिघांबरोबर माझे याआधीही ट्रेक झालेले आहेत. हा एवढा भन्नाट ट्रेक, तोही कोकणच्या हवेत आणि कडक उन्हाळ्यात यशस्वीपणे घडवून आला याचे श्रेय सर्वांनाच जाते.
– सारंग विठ्ठल गोंधळेकर
०२ मे २०२३