दिनांक १० डिसेंबर २०२४. सिंहगड ते रायगड संस्मरणीय पदभ्रमण सहल करून आलो होतो.
अतिशय वेगळी अशी अनुभूती होती. कोणाशीही काही बोलावे असेही वाटत नव्हते. मोक्ष यालाच म्हणत असावेत 🙂 .
मोहिमेची मुहूर्तमेढ १४ जानेवारी रोजीच रोवली गेली होती, पण तेव्हा मी त्यात सहभागी नव्हतो. ऑगस्ट मध्ये रामदरा-मल्हारगड दरम्यान प्रद्युम्नमुळे आमची भेट झाली पुढे साधारण सप्टेंबर अखेरीस योजनेवर काम सुरु झाले. बिपिनरावांचा यात सर्वस्वी सिंहाचा वाटा होता. पूर्वी झालेल्या चर्चेत राजगड ते रायगड ट्रेक करायचा विचार होता. पण मग सिंहगड ते रायगड करूया असे ठरले. असा ट्रेक पुन्हा पुन्हा होणार नाही माहित होते कारण एकूणच वयोमर्यादा आणि अनुभव लक्षात घेता, ट्रेक आणि सहल असे एकत्रित रूप असावे असे ठरले. नंतर मग रेकीकरीता ऑक्टोबर पासून सिंहगड ते विंझर, राजगड, मोहरी असे काही ट्रेक / प्रवास सुरु झाले. वाटाड्या, मुक्काम आणि इतर सोयींसाठी गाठीभेटी होऊ लागल्या. याबाबत बिपिनचे मानावे तितके आभार थोडेच आहेत.
साधारणपणे काँक्रिट / डांबरी रस्त्यावरून ट्रेक टाळणे आणि रात्रीचा मुक्काम शक्यतो चांगल्या ठिकाणी करणे; अशा काही उपसूचना ग्राह्य धरून बेत ठरला !
गुरुवार, ५ डिसेंबर:
-ऑफिसचे काम संपवून संध्याकाळी सिंहगड पायथ्यापासून सुरुवात
-सिंहगडावर मुक्काम
शुक्रवार, ६ डिसेंबर:
-सकाळी लवकर विंझरकडे प्रस्थान
-विंझर ते गुंजवणे गाडीने प्रवास
-गुंजवणे पायथ्याला दुपारचे जेवण आणि राजगडाकडे प्रस्थान
-राजगडावर मुक्काम
शनिवार, ७ डिसेंबर:
-सकाळी तोरण्याकडे प्रस्थान
-भुतोंडे खिंडीत नाश्ता
-वाळंजाई दरवाजा मार्गे भट्टी
-भट्टीतून गाडीने वेल्हेमध्ये दुपारचे जेवण आणि पुन्हा केळद कडे प्रस्थान
-केळदला माहीती असलेल्या चांगल्या विश्रामगृहा मध्ये मुक्काम
रविवार, ८ डिसेंबर
-पहाटे मोहरीकडे प्रस्थान
-बोराट्याच्या नाळेतून लिंगाणा माची पाणे / सिंगापूर नाळेतून दापोली (बोराटा मार्गे वाटाड्या न मिळाल्यास)
-वारंगी / छत्री निजामपूर ते रायगड
-एकूण परिस्थिती नुसार नाचणटेपाची गुहा पाहणे
-पाचाड मध्ये मुक्काम
सोमवार, ९ डिसेम्बर
-रायगड दर्शन
-पाचाड वाडा , समाधी दर्शन
-मुक्काम
मंगळवार, १० डिसेंबर
-गाडीने पुण्याला परत
जेवढी उत्सुकता या ट्रेक बद्दल होती, त्याही पेक्षा जास्त आपल्याला हे जमेल का याचेच दडपण होते. सरावातील ट्रेक दरम्यान सिंहगड चढताना ९०% आर्द्रता, ० वारा, आणि पाठीवरील कमीतकमी १०-१२ किलो वजनाने खूप दमछाक झाली. पुणे दरवाजा चढायला ८० मिनिट लागले होते. हा अनुभव लक्षात घेता अजून सरावाची गरज आहे हे लक्षात आले होते. पण पुढे डिसेंबर मध्ये हवामान थोडे अनुकूल असेल हे ही माहित होते. सर्वांचाच जमेल तसा सराव सुरु होता. कधी सिंहगड, राजगड, रामदरा – मल्हारगड – रामदरा, कानिफनाथ, बोपदेव घाट असे ट्रेक केले, पण तरीही आत्मविश्वास येत नव्हता. नंतर मग AMK ची संधी आली आणि मग सरावासाठी १०-१२ किलो बॅग घेऊन ट्रेक केला. यामुळे रायगड पर्यंत आपण जाऊ शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला. याबरोरबरच वाटाड्या, मुक्कामाची व्यवस्था, पाण्याची सोय, असे सगळे नियोजन सुरु होते. यात खुप लोकांचे साहाय्य लाभले, विविध ट्रेकिंग ग्रुप, ज्यांनी हा ट्रेक काही दिवसांपूर्वी केला अशी मंडळी, असे ट्रेक आयोजित करणारी मंडळी सर्वांची नावे देणे शक्य नाही, पण सर्वांचे खूप खूप आभार. जशी जशी वेळ जवळ येत होती तसे अजूनही काही मंडळी बरोबर येण्यास उत्सुक होती परंतु हा ट्रेक शारिरीक अणि मानसिक ताकदीचा पूर्ण कस लागणारा असा असल्याने पूर्व तयारी हा भाग अतिशय महत्त्वाचा होता त्यामुळे बिपिन, प्रद्युम्न, योगेश, विजय, विकास आणि मी असा सहा जणांचा छोटा ग्रुप या मोहिमेसाठी ठरला. कोणी काय काय गोष्टी घ्यायच्या, नकाशे, संपर्क क्रमांक असे सगळे नियोजन ठरून, कॅराबिनर, शॉर्ट रोप, ट्रेकिंग साहित्य , ई. खरेदी झाली. हवामान अंदाजही वारंवार बदलत होते. कधी पाऊस कधी थंडी, त्यामुळे साहित्य आणि वजनाचे नियोजन कोलमडत होते.
गुरुवार ५ डिसेंबर उजाडला, नेमका आज कामाचा भार जास्त होता. कसे-बसे काम संपवून, ठरल्या प्रमाणे सर्व जण दुपारी ३.३० ला संतोष हॉल जवळ जमले. आधीच ठरवून ठेवलेली गाडी आली आणि प्रवास सुरु झाला. आतकरवाडीत महेंद्र दादाच्या हॉटेलवर चहा घेतला आणि पुढे पायथ्याला आलो. ४. २५ ला नारळ फोडून मोहिमेची सुरुवात झाली. आजही वारा अजिबातच नव्हता, आणि या आठवड्यातील आर्द्र हवा आणि तापमान त्रास देत होते. साधारण अर्धा पाऊण तासाने थोडा गारवा जाणवला आणि मग वेगही वाढला. बिपिन मॅरेथॉन धावपटू असल्याने, सर्वात पुढे होते आणि तासाभरातच वर पोहोचले. एक-एक करत साधारण सव्वा ते दीड तासात सर्वजण वर आले होते. थोडावेळ बसून फोटो काढून, ६.०५ / ६.१० ला गडावर निघालो. आपटे बंगल्याचे आरक्षण आधीच केलेले होते. पोहोचल्यावर मग यथेच्छ कांदाभजी चहा घेऊन, गप्पा गोष्टी झाल्या. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली. जेवणानंतर दह्यावर सर्वानी ताव मारून थोडा वेळ झोपण्यापूर्वी कॅराबिनर, रोप हाताळणे, प्रुसिक, फिगर ऑफ एट, बो लाईन, अशी प्रात्यक्षिके केली.
६ डिसेंबर, शुक्रवार! झोप अशी लागली नव्हती पण आराम छान झाला होता, कालची कांद्याची चटणी आज जरा त्रास देत होती. 🙂 थोड्याच वेळात योगेश दादांचेही गडावर आगमन झाले. चहा घेऊन आम्ही सुभेदारांच्या स्मारकाकडे कूच केले. फोटो काढून साधारण सकाळी ७.२० ला विंझरकडे निघालो. SRT मॅरेथॉन मुळे रेकी केली त्यावेळी पेक्षा सोपी झाली होती. ठिकठिकाणी फिती लावल्या होत्या आणि फांद्याही छाटलेल्या होत्या. सुरुवातीला वातावरण सुखद होते आणि जास्त दवही नव्हते, पण नंतर उन्हाचा चटका जाणवू लागला. त्यातच कुसळे पॅन्टमध्ये शिरून त्रास देत होती. सुदैवाने मला तो त्रास झाला नाही. पण योगेशला मधेच सॉक्स आणि पॅन्ट बदलावी लागली, तर बिपिनने देखील पुढे गुंजवणे येथे जाताना साखर येथील बाजारपेठेत नवीन पॅन्ट विकत घेतली. विंझरकडे उतरताना शेवटचा ट्रॅव्हर्स बाकी असताना थोडी पोटपूजा केली . साधारण ११. ०५ ला धनगरवाडीत उतरलो आणि पुढे डांबरी रस्त्यावरून विंझर कमानीकडे निघालो. ऐनवेळी ठरवलेली गाडी येणार नाही असे कळले, हीच (इको) गाडी आम्हाला दुसऱ्या दिवशी भट्टी ते केळद आणि केळद ते मोहरी सोडणार होती . बिपिननी त्वरित फोनाफोनी करून आकाश कचरे यांच्यामार्फत दुसऱ्या गाडीची व्यवस्था केली. साधारण ११:५५ ला आम्ही गाडीने विंझरहून गुंजवणेला निघालो. २०-२५ मिनिटात गुंजवणे ला पोहोचलो. हॉटेल दत्त प्रसाद मध्ये जेवण केले. पाणी भरून घेतले आणि थोडा आराम करून दुपारच्या उन्हात १.५५ ला राजगडाकडे निघालो. नुकतेच झालेले जेवण पाठीवरील १२-१३ किलोचे वजन, ऊन, आर्द्रता यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. बरेच थांबे घेत घेत ४.१५ ला चोर दरवाजा गाठला. वातावरण आता आल्हाददायक होऊ लागले होते. माचीवर थोडी भटकंती केली, चहा घेतला, तळ्यातील पाणी काढून हात पाय घुवून घेतले. आता छान ताजेतवाने वाटत होते. आकाशने टेन्टची सोय केली होती, त्यामुळे मंदिरात किंवा इतरत्र राहण्याची गरज नव्हती त्यामुळे जरा कमी साहित्य घेऊन ट्रेक करता आला होता. एक अडचण अशी झाली होती की, मोहरीचे वाटाड्या बाळू मामांशी काही संपर्क होत नव्हता, किंवा झाल्यास त्यांचे काही खात्रीशीर उत्तर मिळत नव्हते. ही गोष्ट पूर्ण मोहिमेवरच गदा आणू शकणार होती. मग बिपिनकडून पर्यायांची चाचपणी सुरु झाली. आकाशचे मामा आम्हाला भट्टीकडे वाट दाखवायला येणार होते. मग तेच पुढे येऊ शकतात असे कळले, पण ते बोराट्याच्या नाळेतून खुप वर्षांपूर्वी गेले होते, म्हणून सिंगापूर नाळेतून जाऊ शकतो असा पर्याय सुचवला. पण या सगळ्यामुळे आर्थिक भार वाढणार होता. कारण त्यांनी मागणी केलेली रक्कम मोहरीच्या वाटाड्याच्या दुपटीहून जास्त होती. आणि त्यांच्या व आता नवीन गाडी चालक जे आम्हाला भट्टी ते वेल्हे, वेल्हे ते केळद आणि केळद ते सिंगापूर सोडणार होते त्यांच्या राहण्या आणि खाण्याची सोय केळद मध्ये करावी लागणार होती. पण आता दुसरा पर्याय नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला. पुढे पद्मावती देवीचीआरती झाल्यावर मग ८ वाजता जेवण केले. सिंहगडचा अनुभव लक्षात घेऊन आज मी फक्त वरण भात खीर खायचा निर्णय घेतला त्यामुळे तो योग्यच ठरला, पण बाकीचे सगळेच पदार्थ मसूराची उसळ,बटाटाभाजी, मिरचीचा ठेचा ई. यांची चव अगदी अप्रतिम होती. रात्री काही मंडळी वस्तीला होती, त्यांच्या गोंगाटाने झोप येत नव्हती. साधारण ३ वाजता झोप लागली.
७ डिसेंबर, शनिवार! पहाटे ५ ला बिपिननी आवाज दिला आणि जाग आली. दोन तासात छान झोप झाली होती. सर्व गोष्टी आटोपून, ५.४५ ला तोरण्याकडे प्रस्थान ठेवले. आळू दरवाज्याजवळ थोडे फोटो काढून पुढे निघालो. ६.५५ ला भुतोंडे खिंडीत पोहोचलो, तेथे नाश्ता-चहा घेऊन थोडी विश्रांती घेतली. आकाशनेच पोहे, पाणी, ताक, चहा अशी सोय केली होती. आकाशच्या आई आमच्यासाठी हे सर्व तेथे घेऊन आल्या होत्या. तो चवदार नाश्ता करून, पाणी भरून घेऊन सकाळी ७.३० ला पुन्हा तोरण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. सावलीतून जात असताना उन्हाचा काही त्रास नव्हता पण जसे जसे डोंगर धारेवर लागलो तसे ऊन जाणवू लागले. बुधला माचीजवळ जाईतोवर दोन वेळा थोडी विश्रांती घेतली. साधारण १०.०५ ला रडतोंडी बुरुज येथील लोखंडी शिडी जवळ पोहोचलो तेव्हा SRT Ultra मॅरेथॉन चा पहिला स्पर्धक हेमंत लिंबू मागून आला होता, त्याला अडथळा होऊ नये म्हणून थोडा वेळ थांबलो आणि त्याचे अभिनंदन केले. तो वर गेल्यावर मागून मीही वर पोहोचलो. बिपिन नी त्याला पाणी आणि enegy gel दिले. तोवर दुसरा स्पर्धक सोम बहादूर देखील पोहोचला, त्यालाही energy gel , टोपी आणि पाणी दिले. एक गोष्ट खूप लोकांनी सांगितली ती जाणवली, बुधला माचीवर पाणी कमी पडते. राजगड ते तोरणा ट्रेक चा पूर्वानुभव असल्याने आम्हाला पाणी कमी नाही पडले पण खडा चढ अणि वातावरणातील उष्मा या मुळे जवळ असलेले पाणी अपेक्षेपेक्षा जास्त संपले. बुधला माची चढून सर्वजण पोहोचल्यावर थोडी विश्रांतो घेतली. बरोबर आणलेले ताक तर कोणी इलेक्ट्रोलाइट्स घेतले. १०.३० ला चिणला / वाळंजाई
दरवाज्यातून भट्टी गावात उतरण्यासाठी निघालो. गवतामुळे वाट पूर्ण झाकली गेली होती. वाळंजाई देवीला नारळ फोडून पुढे निघालो. जाता जाता, मला एका ट्रेकर्सच्या ब्लॉग मधील आव्हानाची आठवण करून देण्यात आली, “तोरणा वरून भट्टी मध्ये उतरताना ज्याचे बूड टेकले नाही तो महान ट्रेकर!!!!” मग काय, ते आव्हान स्वीकारून कुठेही बूड न टेकवता यशस्वीपणे भट्टी पर्यंत उतरलो. वाट अत्यंत घसरणीची होती. पाय ठेवला की सर्व मुरूम ढासळत होता. सरळ खाली जात असताना एके ठिकाणी आम्ही उजवीकडे वळलो आणि नंतर वाट संपली. संतोष मामा (वाटाड्या ) पुढे वाट शोधायला गेले होते. तोपर्यंत थोडे खाऊन घेतले. मामा वाट सापडल्यावर आवाज देत होते, पण आवाज कुठून येत आहे हे कळेना. काही वेळाने पुन्हा डावीकडे ओढ्याकडे आलो आणि मग मंदिर दिसले. नंतर Strava वर पाहिल्यावर कळले कि डावीकडे वळायची गरज नव्हती ओढ्याच्या कडेनेच वाट होती. पण यामुळे थोडासा वेळ वाया गेला. मंदिरापर्यंत पोहोचायला १२.५० झाले होते. तेथून १० मिनिटात भट्टी -वाघदरा गावाच्या कमानी जवळ पोहोचलो. कालचेच वाहन येथे तयार होते. तेथून मग आम्ही पोहोचलो वेल्हे गावातील हॉटेल तोरणा विहारला. मस्त चमचमीत जेवणावर ताव मारताना, पाय दुखणे, पायाला आलेले फोड असा दुसरा कोणताही विचार येत नव्हता. येथूनच एक कार ची सोय केली होती जी पुण्याला जाणार होती आणि आमचे काही साहित्य आम्हाला पुण्याला पाठवता येणार होते. वाटाड्या ची अनिश्चितता त्यामुळे आता शेवटी बोराट्याच्या नाळेऐवजी सिंगापूर नाळेतून जायचा बदल केला असल्यामुळे, तांत्रिक साहित्य, वापरलेले कपडे, रेनकोट एका बॅग मध्ये भरून पाठवल्याने थोडे वजन कमी झाले. त्याबदल्यात आता जास्त पाणी आणि खाद्यपदार्थ नेता येणार होते तरीही पाणी अणि पुढच्या प्रवासाची बेगमी याचे वजन पाठीवर १०-१२ किलो नक्कीच होते. वेल्हे येथून पाणी आणि इतर खरेदी करून आम्ही पुढे केळद कडे निघालो. अंदाजे ५.१५ च्या सुमारास तोरणमाची रिसॉर्टला पोहोचलो. आणि गरम पाण्याने अंघोळ, अहाहा ! थोड्या वेळाने चहा भजीने संध्याकाळचा जठराग्नी शांत केला. त्यातच बिपिनरावांचे पाकीट सापडेना, मग पुन्हा तो अणि प्रद्युम्न दोघे परत एकदा वेल्हेला जाऊन आले. आणि पाकीट नंतर बॅग मधेच सापडले. तोपर्यंत योगेशनी आणि मी पायावर थोडा औषधोपचार केला. जेवायला अजून वेळ होता तेव्हा मग बिपिनरावांची बासरी ची मैफिल रंगली आणि वेळ कसा गेला कळलेच नाही. झकास जेवण झाल्यावर दुसऱ्या दिवशी साठी सामानाची बांधाबांध करून ठेवली. सर्वच ठिकाणी बिपिनद्वारे केलेली विविध मिठायांची व्यवस्था अप्रतिम होती आणि त्यावर पुन्हा मसाला पान, निशब्द ! हे सर्व वजन बिपीननी नेहमी वाहून नेले हे विशेष. रात्री योगेशना थोडा स्नायूंचा त्रास जाणवत होता त्यामुळे उद्या येण्याबद्दल थोडी शंका निर्माण झाली होती. औषधोपचार करून सकाळी काय ते ठरवू म्हणालो आणि सकाळी ट्रेकर ठणठणीत ! सकाळच्या मुख्य आणि लांब पल्याच्या तंगडतोडीसाठी मानसिक तयारी करून झोपलो.
८ डिसेंबर,रविवार! सकाळी ४.०० लाच जाग आली होती, लवकरच मस्त गरम पाण्याने अंघोळ करून फटाफट आवरलं. चहा बिस्कीट खाल्ली. आमचा नाश्ताही बांधून तयार होता. अंदाजे ५.४० ला सिंगापूर कडे निघालो, अर्धा पाऊण तासात तिथे पोहोचलो. तिथे एक मामा दिसले, आमच्याबरोबरचे वाटाड्या होते त्यांनी थोडी चौकशी करून विठ्ठल मामांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला. आणि आता पोलीस पाटील – विठ्ठल रामजी मोरे आमचे लीडर झाले. मध्ये खूप गप्पाही झाल्या. श्री दिलीप वाटवे सरांबद्दलही खूप आठवणी ते सांगत होते. मला ते माहित आहेत असे सांगितल्यावर मग त्यांना माझा निरोप द्या म्हणाले. साधारण ७.१५ ला आम्ही सिंगापूर नाळेकडे निघालो. मधेच एका ठिकाणी ओढ्यात नाश्ता केला. आणि पुढची वाट धरली. वाट तशी बरी होती. पण २-३ ठिकाणी मात्र एका बाजूस खाली खोल दरी अणि हाता पायांचा योग्य समन्वय ठेवून काळजीपूर्वक उतरणे या मुळे काही जणांना उतरायला थोडा वेळ लागला, पण बाकी नंतर काठिण्य असे काही नव्हते. मधेच लिंगाण्याचे दर्शन होत होते. शेवटी १०. ०० च्या सुमारास खाली काळ नदीपात्रातून जायला सुरवात केली.
१०. ३५ ला दापोली जवळ नदीपात्रात पुन्हा फोटो काढून घेतले कारण आता तेथून रायगडाचे दर्शन होत होते. फोटो आणि थांबे वाढल्याने वेग मंदावला होता. दापोली गावात पोहोचायला आम्हाला आणखी ०५-१० मिनिट गेलो असतील. तेथूनच मग पुढे वाळण कोंडीकडे निघालो. ११. १० तेथे पोहोचलो. वरदायिनी मातेचे दर्शन घेतले आणि थोडा आराम केला. येथूनच मग आमच्या दोन्ही वाटाड्यांनी आमचा निरोप घेतला. थोडे लिंबू सरबत पिऊन ताजेतवाने झालो. येथून बिरवाडीकडे जायला वाहने मिळतात. पण पाचाडकडे जायला वळसा पडेल म्हणून मग नियोजित वारंगीची वाट पकडली. डांबरी रस्त्यावरून चालणे हे त्रासदायक वाटू लागले होते. पाचाडकडे जायला वारंगीच्या आधीच डावीकडे वाट आहे असे कळले. पण वारंगी मध्ये जाऊन पुढचा बेत ठरवू असे ठरले. वारंगी मध्ये पोहोचायला १.५० झाले होते. येथून २ ते २.३० च्या दरम्यान बिरवाडीला एसटी आहे. वारंगी, छत्र निजामपूर मध्ये वाहतूक व्यवस्था काही नाही. त्यामुळे पुढचा प्रवास थेट पाचाड पर्यंत करावा लागणार होता. वारंगीच्या शाळेच्या व्हरांड्यात जेवण केले आणि वाट विचारून पुढे मार्गक्रमण करीत राहिलो. साधारण २.३५ ला आम्ही वारंगीतून निघालो. एका ठिकाणी थोडी वाट चुकलो आणि दुसरी वाट पकडली. पण नंतर रायगडावरून पाहिल्यावर कळले ती वाटही बरोबरच होती. पुढे एक वस्तीनंतर कच्चा लागला तो पुढे डांबरी सडकेस मिळाला. इथे पोहोचताना पायाला खाली पण फोड आले होते ते खूप त्रास देऊ लागले. त्यामुळे वेग कमी झाला होता. तोपर्यंत बिपिननी हॉटेलला संपर्क करून गाडीची काही व्यवस्था होते का ते पाहिले, पण सिग्नल ठीक नसल्याने बोलणे नीट होत नव्हते. त्यामुळे परत २-३ किमी मागे जाऊन थोडे फार नेटवर्क मिळेल तेथपर्यंत जाऊन दोन तीन संपर्कातून हॉटेल बरोबर बोलून व्यवस्था केली.
केवळ माझ्यामुळे गाडीची व्यवस्था करणे मला पटत नव्हते. आता पायही सेट झाला होता आणि हळू हळू मी पुढे जात राहिलो. पाचाड आता ४-५ किमी राहिले होते, सिंगापूर पासून जवळपास २१ किमी ची पायपीट झाली होती. मागे टकमक टोकही दिसत होते, तिथेच थोडी विश्रांती घेतली. तोपर्यंत एक गाडी आली ती आम्हालाच न्यायला आली होती. या रस्त्यावर फारशी वर्दळ नाही अधून मधून एखादी दुसरी दुचाकी / चारचाकी नजरेस पडली तेवढीच. गाडीने १० मिनिटात ५. २० च्या सुमारास आम्ही पाचाडला हॉटेल देशमुख ला पोहोचलो. पायाच्या फोडांतून पाणी काढून टाकून औषधोपचार केला. नंतर रात्रीचे जेवण जेवण झाल्यानंतर थोडे बाहेर फिरून आलो आणि शेवटच्या टप्प्याच्या तयारीने झोपी गेलो.
९ डिसेंबर, सोमवार! इथपर्यंत आलो आहोत हे खरं वाटत नव्हते. आज आता आमची दोन गटात विभागणारी होतो मी, प्रद्युम्न आणि विकास, रायगड फिरून नाचनटेपाच्या गुहेकडे जाणार होतो आणि बिपिन, योगेश आणि विजय ही त्रयी रायगड करून महाडला जाऊन येणार होते. सकाळी नाश्ता करून ८ वाजता नाणे दरवाजा गाठला कारण येताना चित्त दरवाजाकडे येऊन वाघबिळाकडे सहज जाता येणार होते. नाणेदरवाजातून बरीच खेचरं-गाढवे दगड गडावर पोहचवण्याच्या कामे जुंपली होती. त्यांना रस्ता देत देत .. प्रथम आम्ही टकमक टोकाकडे गेलो. तेथे थोडे विडिओ काढून विश्रांती घेतली सरबत वगैरे घेऊन झाल्यावर, पुढे वाडेश्वर आणि महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. नंतर गडावरील काही वास्तू पाहत आम्ही दोन गटात विभागलो. प्रद्युम्न मंदिराजवळच थांबला. विकास आणि मी मागे फिरून आलो. तिकडे उत्खनन केलेल्या वास्तूंचे जतन करण्याची कामे चालू होती. अगदी भवानी टोकाकडे न जात परत आलो. प्रद्युम्नला घेऊन होळीच्या माळावरील वास्तू, राजवाडा, राणीवसा पाहून वाघ दरवाज्याकडे जायला निघालो. प्रद्युम्नला राजवाड्याजवळ सोडून आम्ही वाघ दरवाज्याकडे गेलो. जाताना नवीन उत्खनन केलेल्या वास्तू, मंदिर, तलाव पाहत पुढे गेलो. सगळीकडे डागडुजीची कामे चालू होती. वाघ दरवाज्याजवळ बाहेरील वाट अगदी धोकादायक आहे. खाली जाऊन वाट दिसते का पाहण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षा साधने नसल्याने फार पुढे डोकावता आले नाही. पण तेथील कडा सरळसोट आहे असे वाटले. पावसाळयात मोठा धबधबाही तयार होता असेल. तेथूनच गवतातील निसरड्या वाटे ऐवजी सरळ प्रस्तरारोहण करून थेट दरवाजाजवळ वर आलो. तिथे बोर्लीवरून आलेलया दुसऱ्या एका समूहातील मुलांनी आम्हाला श्रीखंड चपाती खायला दिली. मस्त भुकेच्या वेळी मिळालेली मेजवानी, मग काय विचारता. २. २० वाजता तेथून वर आलो आणि रज्जुराथाने खाली जायचा निर्णय घेतला. ३ वाजता खाली जाऊन जेवण केले. मग आधी वाघबीळ पाहण्याऐवजी जिजाऊ समाधी पाहून यावे असा विचार केला, कारण बंद होण्याची वेळ ६ ची होती. तिकडे जायला पण महेश दादांचीच गाडी मिळाली. तेथून कोट पाहायला रात्री जाऊ असे ठरवले. वाघबीळ पाहायला ४. १५ ला पोहोचलो. १ मिनिटातच गुहेत पोहाचलो. मग आम्ही निवांत सूर्यास्ताची वाट पाहत बसलो. गप्पा झाल्या, विकासची मस्त झोप झाली. आणि सूर्यास्ताचा तो मस्त नजारा पाहून ६.१० ला खाली आलो. चहा वडापाव खाऊन आता पाचाडचा कोट पाहण्यासाठी पायपीट करायची होती. ७.०० वाजता तेथे पोहोचहलो तर पूर्ण काळोख होता. गवात वाढलेले होते. दुरावस्था पाहवत नव्हती. जास्त धोका न पत्करता, सकाळी परत यायचा निर्णय घेतला. हॉटेलला परत जाऊन जेवण केले आणि मोहीमपूर्तीचा आनंद मनात साठवत झोपलो. ईकडे बिपिन, योगेश, विजय दुपारी ३ नंतर ३-४ तास महाड दर्शन करून आले. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे, वीरेश्वर मंदिर, साई मंदिर दर्शन तसेच प्रसिद्ध असे करमरकर यांचेकडे वडा- पाव, समोसा, चहा अशी खाद्य भ्रमंती आणि थोडी बाजारपेठ खरेदी अशी धावती भेट देवून हे तिघे संध्याकाळी पाचाड ला पोहोचले.
१० डिसेंबर, मंगळवार! सकाळी लवकरच जाग आली, मस्त गरम पाण्याने अंघोळ करून तयार झालो. बाकीचे अजून तयार नव्हते. आऊसाहेबांचा महाल – वास्तू पाहून यायचा विचार करून खाली गेलो तर बिपिन आधीच खाली होता. मग चहा घेऊन ७.३५ पर्यंत आम्ही दोघेही आऊसाहेबांचा वाडा – वास्तू पाहून आलो. आल्यावर नाश्ता केला. तोपर्यंत पुण्याला सोडण्यासाठी गाड्या तयार होत्या. सकाळी ८. ४५ ला हॉटेल सोडले. जाताना बाकीच्यांसाठी पुन्हा वाडा आणि समाधीला थांबलो. त्यानंतरचा थांबा थेट ताम्हिणीजवळ quick bite ला केला. चहा घेऊन थेट पुणे.
अशाप्रकारे मोहिमेची सुखद सांगता झाली.
पुरवणी १ : पदभ्रमण अंतर (गाडी प्रवास वगळून)
दिवस १ ~ ३.५ किमी : सिंहगड चढाई
दिवस २ ~ १६ किमी: सिंहगड ते विंझर, गुंजवणे येथुन राजगड चढाई
दिवस ३ ~ १७ किमी : राजगड ते तोरणा ते भट्टी गाव
दिवस ४ ~ २१ किमी : सिंगापूर गाव ते पाचाड
दिवस ५ ~ १५ किमी : रायगड दर्शन, आजूबाजूचा परिसर
पुरवणी २: संपर्क क्रमांक
-अनिल मोरे,गाडी चालक, संतोष हॉल ते आतकरवाडी : ७५०७१५२१४०
-आपटे बंगला, सिंहगड : ९३०९४४५७७६
-लक्ष्मण दादा, गाडी चालक विंझर , वेल्हे : ८९९९००४९१८
-आकाश कचरे, राजगड मुक्काम :: ९०६७३३६८९४
-बाळू मामा (वाटाडे, मोहरी) : ७४९९४२९५९४
-विठ्ठल मोरे मामा (वाटाडे, सिंगापूर) : ९४२००४८९७०
-देशमुख हॉटेल, पाचाड : ९६०११६१७१८
-महेश पाचाडकर, गाडी चालक, रायगड:९६८९५९४४२३
पुरवणी ३: खर्च ६३३०७/-
-तपशील फोटोमध्ये पहा
पुरवणी ४: सहभाग
– बिपिन कुलकर्णी
– प्रद्युम्न रास्ते
– योगेश चव्हाण
– विजय तोडणकर
– विकास माळी
– किशोर पवार
-Kishore Pawar
Must be great experience and also satisfying. अतिशय सुंदर विवरण just gave feeling of joining actual Treak